मीरा-भाईंदरमध्ये मनमानी शुल्काला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:02 AM2019-10-01T01:02:25+5:302019-10-01T01:02:48+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील मुर्धा ते उत्तन चौक आणि नवघर-गोडदेव आदी गावांतील ग्रामस्थांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोमवारी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली.

 Opposition to arbitrary charges in Mira-Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये मनमानी शुल्काला विरोध

मीरा-भाईंदरमध्ये मनमानी शुल्काला विरोध

googlenewsNext

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील मुर्धा ते उत्तन चौक आणि नवघर-गोडदेव आदी गावांतील ग्रामस्थांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोमवारी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली. ग्रामस्थांना भूमिगत गटार योजनेचा लाभ मिळणार नसतानाही त्यांच्याकडून आठ वर्षांपासून सुरू असलेली मलप्रवाह सुविधाकराची वसुली, अवास्तव घनकचरा शुल्क तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेता चालवलेल्या घरांच्या सर्वेक्षणाला शिष्टमंडळाने विरोध केला आहे. आयुक्तांनी आचारसंहितेनंतर बैठक बोलावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
महापालिकेची तब्बल ५०० कोटींची भूमिगत गटार योजना मुर्धा, राई, मोर्वा, उत्तन, चौक, पाली, डोंगरी तसेच काशिमीरा महामार्ग परिसरांतील गावांसाठी नसतानाही २०११ पासून पालिका आठ टक्के इतका मलप्रवाहकर या ग्रामस्थांकडून वसूल करत आहे.
भार्इंदर पूर्व आणि पश्चिम भागांतील नवघर, गोडदेव, खारी, बंदरवाडी, भार्इंदर या गावांमध्येही भूमिगत गटार योजनेचे काम झालेले नसताना येथील ग्रामस्थ व रहिवाशांकडूनही हा कर पालिका वसूल करत आहे.
त्यातच, घनकचरा शुल्काची वसुली प्रतिमाह ५० रुपयांप्रमाणे प्रत्येक घरातून चालवली आहे. ग्रामीण भागात मालमत्ताकर कमी आणि घनकचरा शुल्कवसुलीच अवास्तव अशी स्थिती आहे. तसेच उत्तन भागातील ग्रामस्थ पालिकेच्या बेकायदा डम्पिंगमुळे त्रासले असताना घनकचरा शुल्कामुळे ग्रामस्थ संतापले आहेत.
घरांच्या मोजणी आणि सर्वेक्षणासाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमून त्यांच्याकडून गावठाणांमधील घरांची मोजणी सुरू केल्याने त्यालाही ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
आम्हाला विश्वासात न घेता मोजणी करून नंतर अवास्तव शास्ती पालिका लावणार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या तीनही प्रकरणी गावागावांत विविध संस्था-संघटनांमार्फत बैठका होऊन विरोध केला जात आहे.
मच्छीमार नेते लिओ कोलासो, नवघरचे ग्रामस्थ तथा विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, उत्तन-चौक भागातील नगरसेविका शर्मिला गंडोली, एलायस बांड्या, हेलन गोविंद, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद व जॉजफ घोन्सालवीस यांच्यासह अ‍ॅड. सुशांत पाटील, प्रशांत म्हात्रे, भगवान पाटील, संदीप बुरकेन आदी उपस्थित होते. त्यांनी यावेळी आयुक्तांना या कराला विरोध करत ठाम भूमिका मांडली.

‘तोपर्यंत कर भरणार नाही’
धारावी बेट बचाव समिती, आगरी समाज एकता, उत्तन कोळी जमात, डोंगरी-तारोडी गावपंच मंडळ, चौक सोसायटी व जमात, पाली जमात, राई , मुर्धा, मोर्वा गाव प्रतिनिधी पंच मंडळ आदींचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. मलप्रवाह सुविधाकर व घनकचरा शुल्क रद्द करा तसेच घरांची मोजणी थांबवून आधी ग्रामस्थांना विश्वासात घ्या, अशा मागण्या मांडल्या. आयुक्तांनी आचारसंहिता संपल्यावर बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले असले, तरी तोपर्यंत आम्ही कर भरणार नाही, असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title:  Opposition to arbitrary charges in Mira-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.