विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:00 IST2023-02-07T12:58:51+5:302023-02-07T13:00:10+5:30
घोडबंदर रोड येथील एक ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाइलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमिल कुमार नामक अनोळखी भामट्याने आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी फोन केला.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे : विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या नावाखाली एका महिलेची परमिल कुमार या भामट्याने ४ लाख २९ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी सोमवारी दिली.
घोडबंदर रोड येथील एक ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाइलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमिल कुमार नामक अनोळखी भामट्याने आर्मी पब्लिक स्कूल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी फोन केला. त्यासाठी शुल्क ठरविल्यानंतर दुसऱ्या मोबाइलवरून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. याचदरम्यान, त्या महिलेच्या ॲक्सिस बँकेतील खात्याच्या डेबिट कार्डची माहिती त्याने चलाखीने पाहून घेतली. त्यानंतर या भामट्याने बँक खाते लिंक करण्याचे कारण सांगून महिलेला आधी दहा रुपये नंतर शंभर रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. ती पैसे ट्रान्सफर करीत असताना त्याने तिच्या बँक खात्याची माहिती घेतली.
त्यानंतर हळूहळू तिच्या बँक खात्यातून ४ लाख २९ हजार ७३७ रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपीविरूद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.