One lakh children in Thane district vaccinated today, Pulse Polio Campaign | ठाणे जिल्ह्यातील एक लाख बालकांचे आज लसीकरण, पल्स पोलिओ मोहीम

ठाणे जिल्ह्यातील एक लाख बालकांचे आज लसीकरण, पल्स पोलिओ मोहीम

ठाणे :  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ७६० बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. 
जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटांंतील बालकांचे लसीकरण करण्यासाठी पालकांनी त्यांच्या बालकांना जवळच्या बुथवर घेऊन जाणे आवश्यक असल्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे. 
यासाठी मंगळवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुकाणू समितीची खास बैठक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांच्या खास उपस्थितीत पार पडली. त्यांनी जिल्ह्यातील उपस्थित डाॅक्टरांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जळगावकर आणि मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

भिवंडीतही  जनजागृती
भिवंडी : पालिका क्षेत्रात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी भिवंडी पालिका प्रशासनाने जनजागृती केली आहे. त्याचा प्रारंभ महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या प्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.जी. खरात, डॉ. जयवंत धुळे, अधिकारी सुभाष झळके, बाळाराम जाधव, मिलिंद पळसुले आदी उपस्थित होते.

नऊ हजार ४१८  कर्मचारी सज्ज 
आरोग्य कर्मचाऱ्यांना या मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नऊ हजार ४१८ कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याकरिता जिल्ह्यात एक हजार ७५ बुथ उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दोन हजार ६२९ पथकांसह ५२६ पर्यवेक्षक पथक तयार केले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी २१५ बुथ पर्यवेक्षकांचे असणार आहेत. १५७ मोबाइल पथकही तैनात राहणार आहे.

Web Title: One lakh children in Thane district vaccinated today, Pulse Polio Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.