ठाण्यात कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 22:30 IST2019-09-29T22:25:25+5:302019-09-29T22:30:11+5:30
घोडबंदर रोड येथून मोटारसायकलस्वाराच्या मागे बसून जाणाऱ्या जितेंद्र कुशवाह याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये मोटारसायकलस्वार सिद्धेश जाधव हा सुदैवाने बचावला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मोटारसायकल चालक सुदैवाने बचावला
ठाणे: कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जितेंद्र कुशवाह (२३, रा. उथळसरनगर, ठाणे) या तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. त्याचा साथीदार सिद्धेश जाधव (१९, रा. किसननगर, ठाणे) हा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संतोष सरोदे यांच्या नावावर असलेली ही मोटारसायकल सिद्धेश चालवत होता. त्याचा मित्र जितेंद्र हा मागे बसलेला होता. हे दोघेही २८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडने जात होते. मानपाडा येथील दोस्ती इम्पेरिया इमारतीसमोरून ते जात असताना एका अज्ञात कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सिद्धेश आणि जितेंद्र हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जितेंद्रचा मृत्यू झाला. सिद्धेश याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा अपघात नेमका कसा झाला, याचा उलगडा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.