उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलांच्या खुनी हल्ल्यात, एकाचा मृत्यू तर दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 09:57 IST2018-10-08T09:30:00+5:302018-10-08T09:57:04+5:30
शहरातील सी ब्लॉक परिसरात रविवारी रात्री 8 वाजता अल्पवयीन मुलांनी तिघांवर खूनी हल्ला केला. हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलांच्या खुनी हल्ल्यात, एकाचा मृत्यू तर दोन जखमी
उल्हासनगर - शहरातील सी ब्लॉक परिसरात रविवारी (7 ऑक्टोबर) रात्री 8 वाजता अल्पवयीन मुलांनी तिघांवर खूनी हल्ला केला. हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं 3, सी ब्लॉक परिसरातून रविवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यात आकाश झा, सनी झा व विशाल मिश्रा जात होते. त्यावेळी अर्जुन गायकवाड, राज राजपूत, विकास झा या अल्पवयीन त्रिकुटाने संगनमत करून तिघांवर खुनी हल्ला केला. आकाश व सनी झा यांच्या पाठीवर, गालावर चाकूने वार करून जखमी केले. तर विशाल मिश्रा याच्या छातीवर चाकूने वार केल्याने, तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले आकाश व सनी झा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खूनी हल्ला करून अल्पवयीन त्रिकुट फरार झाले.
मध्यवर्ती पोलिसांना खूनी हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशालचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरतपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आला. विशालचा भाऊ अभिषेक मिश्रा यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी खूनी हल्ला करणाऱ्या अल्पवयीन खूनी त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. खूनी हल्ला करणारे अल्पवयीन त्रिकुट दुलीचंद कलानी कॉलेज परिसरातील राहणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले.