ठाण्यातील भंडार्लीमध्ये एक काेटी ९७ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त; दाेघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: September 25, 2025 23:45 IST2025-09-25T23:44:31+5:302025-09-25T23:45:50+5:30
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

ठाण्यातील भंडार्लीमध्ये एक काेटी ९७ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त; दाेघांना अटक
ठाणे: अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या साहिद खान आणि पंकज साकेत या दाेघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने गुरुवारी भंडार्ली भागातून अटक केली. त्यांच्याकडून एक काेटी ९७ लाख चार हजारांच्या विदेशी मद्यासह दाेन काेटी २२ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील भंडार्ली भागातील मुंब्रा पनवेल राेडवरील तळोजा रूफिंग इंडस्ट्रीज समोर परराज्यातील विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे एका ट्रकमधून वाहतूक हाेणार असल्याची टीप भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे २४ सप्टेंबर राेजी उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेवाळे यांच्या पथकाने सापळा लावून संबंधित ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी मद्याचा साठा आढळून आला. त्यामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे एक काेटी ९७ लाख चार हजारांचे एक हजार ५६० बॉक्स मिळाले. महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता आणि गाेवा राज्यात विक्रीस बंदी असेही या बाटल्यांच्या बाॅक्स वर लिहिलेले हाेते. याप्रकरणी दाेघांना अटक केली असून त्यांच्याकडून १५ हजारांचे तीन माेबाईल, २५ लाख ६५ हजारांचा ट्रक आणि मद्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.