मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास ठाण्यात अटक: तीन महिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 00:36 IST2020-12-11T00:32:27+5:302020-12-11T00:36:00+5:30
आयुर्वेदिक स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया सुशिल तायडे (२४, रा. ठाणे) या व्यवस्थापकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. पैशांच्या अमिषाने गरजू महिलांकडून तो शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे या धाडीत उघड झाले.

कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आयुर्वेदिक स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाºया सुशिल तायडे (२४, रा. मीठबंदर, रोड, कोपरी, ठाणे) या व्यवस्थापकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्या तावडीतून तीन पिडित महिलांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आयुर्वेदिक स्पामध्ये मसाजच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनिल बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडलग यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, पोलीस उपनिरीक्षक एल. जी. सपकाळे, पोलीस हवालदार सुनिल सोननीस आणि अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील ‘मातोश्री निसर्गोपचार व संमोहन केंद्र याठिकाणी सापळा लावला. त्यावेळी बनावट गिºहाईकाच्या मदतीने या पथकाने या स्पाचा व्यवस्थापक तायडे याला ताब्यात घेतले. काही पैशांच्या अमिषाने ३० ते ३५ वर्षीय गरजू महिलांकडून तो शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे या धाडीत उघड झाले. त्यावेळी मुंबई, रायगड आणि नवी मुंबईतील तीन पिडीत महिलांची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. कोपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यवस्थापक तायडे याला १० डिसेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. उपनिरीक्षक एल. जी. सपकाळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.