Coronavirus in Thane : दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात सात प्रवासी आल्याने वाढली चिंता, महापालिकेकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:41 IST2021-11-29T17:40:49+5:302021-11-29T17:41:32+5:30
Omicron Coronavirus Variant : या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असून यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात येणार, असल्याचे ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.

Coronavirus in Thane : दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात सात प्रवासी आल्याने वाढली चिंता, महापालिकेकडून शोध सुरू
ठाणे : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व ठाणे मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार दक्षिण आफ्रीकेतून ठाण्यात आलेल्या ७ प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम ठाणे महापालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असून यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात येणार, असल्याचे ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.
भारतात कोरोनाचा भार एकीकडे ओसरत असताना दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकार कामाला लागले आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दक्षता घेण्यासाठी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक डॉ. शर्मा यांनी सोमवारी दिली.
या सात प्रवाशांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली असून ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रवासी पालिकेला कधीपर्यंत सापडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.