ऑक्टोबर हिटचे निवडणूक प्रचाराला बसत आहेत चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:05 IST2019-10-09T00:05:00+5:302019-10-09T00:05:25+5:30
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू झाली आहे.

ऑक्टोबर हिटचे निवडणूक प्रचाराला बसत आहेत चटके
ठाणे : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने ठाणे जिल्ह्यात हजेरी लावली होती. परंतु, आता सूर्य तळपायला लागला असून ठाण्याच्या पारा ३५ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. त्यामुळे प्रचार करतांना उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही दमछाक होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे या काळात फिरल्यास चक्कर येणे, उलटी, जुलाब असे आजारही बळावण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शरीरातील उर्जा कमी होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचीही दमछाक होऊ लागली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटचे चटकेही बसू लागले आहेत. त्यामुळे सकाळी लवकर प्रचार केल्यानंतर दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आराम करून पुन्हा सायंकाळी सुर्य मावळ्यानंतर प्रचार केला जात आहे. असे असले तरी उन्हा तान्हाचा प्रचार करतांना तहान लागणे, चक्कर येणे, उलटी, जुलाब असे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात उमेदवार हा शक्यतो वाहनातून किंवा रथामधून आपला प्रचार करीत असतो. मात्र, कार्यकर्ते हा पायी चालत असल्याने त्यांची दमछाक उडतांना दिसत आहे. त्यामुळे अशा वेळेस काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रचारात या गोष्टी टाळा : सध्या ठाण्याचा पारा मागील काही दिवसापासून वाढतांना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी तो ३५ अंशापर्यंत पोहचला होता. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच उन्हातून प्रचार करतांना शक्यतोवर भडक कपडे घालू नये, डोक्यावर टोपी असणे आवश्यक आहे. सोबत पाण्याची बाटली ठेवावी, कोल्ड ड्रिंक्स किंवा हॉट ड्रिंक्स पिणे टाळावे, बर्फ गोळा खाणे टाळावे, थंड पेय पिऊ नये, नारळ पाणी प्यावे, डोक्याला रुमाल बांधावा, शक्यतो दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत प्रचार करणे टाळावे. कोल्डड्रींक पिण्यापेक्षा साधे पाणी पिण्यावर अधिक भर दिल्यास अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकेल असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शक्यतो प्रचार टाळावा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.