ओखीतील पावसाने केली भाजीच्या शेतीची नासाडी; उत्तन परिसरातील भाजीपाला शेतीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 17:52 IST2017-12-09T17:51:59+5:302017-12-09T17:52:07+5:30
भार्इंदरमध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरु झाली. यानंतर जोर धरलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही शहरात तळ ठोकला होता.

ओखीतील पावसाने केली भाजीच्या शेतीची नासाडी; उत्तन परिसरातील भाजीपाला शेतीचे नुकसान
- राजू काळे
भार्इंदर - ओखीच्या वादळात ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यात उत्तन परिसरातील भाजीपाल्याच्या शेतीची चांगलीच नासाडी झाली असून त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पीडित शेतकरी सरकार दरबारी मागणी करु लागले आहेत.
मीरा- भार्इंदरमध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरु झाली. यानंतर जोर धरलेल्या पावसाने दुसऱ्या दिवशीही शहरात तळ ठोकला होता. पावसाच्या या अवकाळी संततधारेमुळे उत्तन परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे १५ ते २० एकर क्षेत्रात लावलेल्या भाजीपाल्याची नासाडी झाली असून त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पीडित शेतकरी सरकारच्या मदतीची प्रतिक्षा करीत आहेत.
उत्तन हे पश्चिम सागरी किनाऱ्यावर वसलेले ठिकाण असल्याने येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे. हा व्यवसायही सततच्या तेल सर्व्हेक्षणासह परप्रांतीय व पर्ससीन नेटवाल्यांच्या साम्राज्यामुळे बेताचा झाला आहे. त्यामुळे येथील काही मच्छिमार व ग्रामस्थ मासेमारीला जोडव्यवसाय म्हणून भात व भाजीपाला शेती करतात. तसेच इतर परिसरातील ग्रामस्थ मात्र शेतीवरच आपला उदरनिर्वाह चालवितात. भातशेती पावसाळ्यात बहरत असली तरी मागील ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने या शेतीचे नुकसान केले होते. त्यावेळी भाजीपाल्याची शेती पीक कापणीला आल्याने वाचली होती. मात्र यंदा ओखीच्या वादळात कोसळलेल्या अवकाळी पावसाने त्या शेतीचे नुकसान केले. येथील तारोडी, डोंगरी, आनंदनगर, तलावली आदी परिसरातील शेतकरी पावसाळ्यातील भाताच्या शेतीनंतर हिवाळ्यात भाजीपाल्याचे मोठे पीक घेतात. यातील विशेष म्हणजे येथील आरोग्यवर्धक ठरणाऱ्या सफेद कांद्यांना बाजारात मोठी मागणी असते. या शेतकऱ्यांना स्थानिक तसेच आठवडा बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने ताजा भाजीपाला भार्इंदरमधील नागरीकांना उपलब्ध होतो. परंतु, त्याचे ओखीच्या पावसात नुकसान झाल्याने सुमारे १५ ते २० एकर मध्ये सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांनी लावलेल्या सफेद कांद्यांची रोपे, पालक, चवळी, वांगी, भोपळा, कोथिंबिर, दुधी, मिरची, टोमॅटो आदीं भाजीपाल्यांची नासाडी झाल्याचे शेतकरी एडविन व विक्टर बस्त्याव नुनीस, लेस्ली बोर्जिस, न्यूटन मनू व फॅन्की चार्ली दालमेत, स्टिफन फ्रान्सिस, लियो इनास, संजय रोमन, जॉनी सापेद नुनीस, डॅरल जोसेफ नून यांनी सांगितले. या पिडीत शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्याने त्यांना नव्याने पीक घेण्यासाठी बियाणे खरेदीसाठी पुरेसे पैसे नसल्याचे दुहेरी संकट त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. परंतु, तारोडी येथील शेतकरी स्वयं सहाय्यता गटाच्या माध्यमातुन त्यांना किमान अर्थसहाय्य दिले जात असली तरी पुरेशी नुकसान-भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पीकाचा पंचनामा करावा, यासाठी पिडीत शेतकरी पाठपुरावा करीत असल्याचे डोंगरी येथील प्रेरणा सेवा केंद्राचे सेवक टेनिसन बेलू यांनी सांगितले.