आता एका क्लिकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:48+5:302021-03-22T04:36:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधावाटप दुकानांतील अन्नधान्य गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना वितरित केले जात ...

Now you can get ration card information with one click | आता एका क्लिकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

आता एका क्लिकवर मिळणार रेशनकार्डची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शिधावाटप दुकानांतील अन्नधान्य गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना वितरित केले जात आहे. या दुकानात सध्या काय माल आला, कार्ड अधिकृत आहे की नाही, या माहितीसह अन्नधान्याचा पुरवठा वेळेत व नियमित न केल्यास, अन्नधान्याचे वाटप न झाल्यास, शिधा पत्रिकाधारकास चांगली वागणूक न दिल्यास संबंधित दुकानाची तक्रार ‘मेरा रेशन’ ॲपद्वारे करता येणार असल्याने शिधावाटप दुकानदारांना लाभार्थींना सौजन्यशील वागणूक द्यावी लागणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी शिधावाटप दुकानदार शिधापत्रिकाधारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य, रॉकेल, अन्य किरणा सामान कमी, अधिक प्रमाणात वितरित करतात. काहींकडून धान्याचा पुरवठा न झाल्याचे सांगून सेवा देण्याचे टाळतात. मनमानी करणाऱ्या दुकानदारांची तक्रार दाखल करण्यासाठी शासनाने अन्य दुकानांवर अन्नधान्य घेण्याचा पर्याय (पोर्टेबिलिटी) कार्डधारकास दिला आहे. त्यामुळे मुजोर दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यात ‘मेरा रेशन’ ॲपद्वारे माहिती मिळविण्याची व तक्रार करण्याची सुविधा होत असल्यामुळे शिधावाटप दुकानांवरील वॉच आता अधिक कडक करण्यात येत आहे. दरम्यान, तक्रार करण्यासाठी आता ‘मेरा रेशन’ या ॲपद्वारे तक्रार करून दुकानदारांस वेठीस धरण्याच्या घटना वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

शिधावाटप दुकानातील कार्डसंबंधीच्या माहितीसह अन्नधान्य किती आले, त्यातून किती वाटप झाले, कार्ड अधिकृत आहे की नाही, अन्नधान्य, किराणा माल स्वस्त व माफक दराने वितरित होत आहे की नाही, आदींची तक्रार व माहिती शिधापत्रिकाधारकास ‘मेरा रेशन’ या ॲपवर एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी या उपयुक्त ॲपला शिधापत्रिकाधारकांना डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित दुकानाची माहिती मिळविण्यासह त्यातील कार्ड किती अधिकृत, किती बनावट, अन्नधान्याचे आतापर्यंत झालेले वाटप, शिल्लक, आदींची माहिती या ॲपद्वारे त्वरित मिळवणे शक्य होत आहे.

........

९५ हजार कार्डधारकांचे अन्नधान्य बंद

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कार्डधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ घेतला नाही. अशा एक लाख नऊ हजार ९०५ कार्डधारकांपैकी ९४ हजार ९०७ कार्डधारकांचा अन्नधान्य पुरवठा आता कायमचा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कार्डवरील अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी कोरोनामुळे नोकरीस मुकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना कार्ड देऊन अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांत त्यांच्या नावांचा समावेश केला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे एक लाख ४८ हजार कार्डधारकांपैकी बहुतांशी सधन कुटुंबांकडून स्वस्त धान्य खरेदी केले जात नाही, तर शहरी भागातील प्राधान्य कुटुंब यादीतील सात लाख ४४ हजार ४७७ कार्डधारकांपैकी पाच लाख १६ हजार ७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करत आहेत.

..........

शहरी भागातील कार्डधारक

७,५७,६००

प्राधान्यक्रमाचे अन्नधान्य लाभार्थी - ६०,८४०१

अंत्योदय योजनेतील कार्ड - १३,१३०

..........

जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये प्राधान्यक्रमाचे कार्डधारक - ५,००,०००

अंत्योदय कार्डधारक - ४८,००० लाभार्थी

प्रतिक्रिया -

आपल्या जिल्ह्यात अजून असा काही ॲप आलेला नाही; पण आपले सरकार पोर्टलद्वारे कार्डधारकांना तक्रारी करण्याची संधी आहे. त्यात आता या ॲपद्वारे दुकानाची, कार्डची माहिती एका क्लिकवर मिळवणे व तक्रार करण्यासाठी नवीन ॲपची सुविधा सध्या तरी आपल्याकडे नाही.

- गणेश हरणे,

शिधावाटप निरीक्षक, ठाणे

Web Title: Now you can get ration card information with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.