आता आत्महत्या करण्याची वेळ आलीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:24+5:302021-03-23T04:42:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या वर्षभरापासून कधी कमी कधी जास्त प्रमाणात वाढणाऱ्या कोरोनामुळे ठाण्यातील खाजगी ट्रॅव्हल्सचालकांच्या व्यवसायावर ...

आता आत्महत्या करण्याची वेळ आलीय
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या वर्षभरापासून कधी कमी कधी जास्त प्रमाणात वाढणाऱ्या कोरोनामुळे ठाण्यातील खाजगी ट्रॅव्हल्सचालकांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसत आहे. कोरोना कमी झाल्याने त्या काळात डबघाईला आलेला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता पुन्हा त्याची दुसरी लाट आल्याने व्यवसाय जेमतेम ५ ते १० टक्क्यांवर आला आहे. त्यातही आता बुकिंग मिळविण्यासाठी काही ट्रॅव्हल्सचालकांमध्ये स्पर्धा लागली असून, त्याचा फटकाही बसत आहे.
वर्षभरापासून कोरोनाची लाट सुरू असून ती अद्यापही शमली नाही. त्यामुळे त्याचा साहजिकच सर्वांवर परिमाण झाला आहे. त्यातही खाजगी ट्रॅव्हल्सचालकांचे यात कंबरडे मोडले आहे. अनेक व्यावसायिकांवर हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. मार्चअखेर असल्याने बँकांचे हप्ते थकविल्याने बँका गाड्या जप्त करू लागल्या आहेत. कोरोनाआधी १०० टक्के सुरू असलेला व्यवसाय आता १० टक्क्यांच्या आसपास सुरू असून त्यातून घर कसे चालवायचे, चालकांचे पैसे कसे द्यायचे असा पेच त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. त्यातही सध्या व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांना अनेक ट्रॅव्हल्सचालकांचमध्ये सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. पहिले प्रत्येक वाहनांचे दर हे निश्चित होते. परंतु, आता कमी दरातही अनेक ट्रॅव्हल्सचालक तयार होत असल्याने त्याचाही फटका अनेकांना बसला आहे. त्यातही चालकांचे पैसे कसे द्यायचे, गाड्या दारात उभ्या राहिल्याने त्यांचीही कामे आता निघू लागली आहेत. त्यांचा मेन्टेनन्स शिल्लक आहे. रस्त्यावर त्या निघतील तरच या व्यवसायात असलेल्यांचे पोट भरणार आहे. परंतु, गाड्याच रस्त्यावर धावत नसल्याने या सर्वांचे गणित जुळवताना नाकीनऊ आले असून, आता तर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे ट्रॅव्हल्सचालक सांगत आहेत.
कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या
- कोरोनाआधी ठाण्यातून रोजच्या रोज २५० ते ३०० गाड्या जात होत्या.
सध्याची संख्या - सध्या काहींची एकही गाडी बाहेर पडत नाही, तर दिवसाला सरासरी १० ते १५ गाड्या रस्त्यावर धावत आहेत.
गाडी रुळावर येत होती; पण
मधल्या काळात कोरोना कमी झाल्याने व्यवसाय ६० टक्यांपर्यंत सावरला होता. परंतु, पुन्हा कोरोनाची लाट आल्याने, व्यवसायावर त्याचा परिणाम झाला असून, सध्या ५ ते १० टक्केच व्यवसाय सुरू आहे. त्यातही बँकवाले गाड्या जप्त करू लागले आहेत.
बँकेचे हप्ते थकले -
मधल्या काळात कोरोना कमी झाल्याने बँकेचे काही हप्ते भरले होते. परंतु, आता पुन्हा मागील तीन ते चार महिन्यांपासून हप्ते थकल्याने बँकवाल्यांनी मार्च अखेरचे कारण देऊन गाड्याच जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
(विकास शेलार - ट्रॅव्हल्समालक)
आता तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. चालकांचा पगार कसा द्यायचा? बँकेचे हप्ते कसे भरायचे? इमारतीचे मेंन्टेनन्स शिल्लक आहे. शासनाकडे अर्ज करूनही त्यावर अद्यापही काही तोडगा निघालेला नाही.
(व्ही. के. शेट्टी - ट्रॅव्हल्समालक)