तूरडाळ १४० वर आता हरबऱ्याच्याच डाळीचे वरण करा
By Admin | Updated: August 18, 2015 23:08 IST2015-08-18T23:08:17+5:302015-08-18T23:08:17+5:30
महाराष्ट्रात सांबार तसेच वरण बनविण्यासाठी स्वयंपाकात रोजच लागणारी तुरीची डाळ गेल्या दोन महिन्यात ३० ते ५० टक्क्यांनी महाग होऊन १४० रुपये किलोवर गेली आहे

तूरडाळ १४० वर आता हरबऱ्याच्याच डाळीचे वरण करा
ठाणे : महाराष्ट्रात सांबार तसेच वरण बनविण्यासाठी स्वयंपाकात रोजच लागणारी तुरीची डाळ गेल्या दोन महिन्यात ३० ते ५० टक्क्यांनी महाग होऊन १४० रुपये किलोवर गेली आहे. साठेबाजी आणि गारपीटसारख्या नैसर्गिक संकटांमुळे घटलेली आवक यामुळे तुरडाळ कडाडल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यात १०० रुपये किलोने मिळणारी तूरडाळ आता १२० रुपये किलोने बाजारात विक्रीस उपलब्ध आहे . उत्तम प्रकारची तूरडाळ१४० रुपये किलोने विकली जात आहे. इतकेच नव्हे तर तूर डाळीनंतर स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापर होत असणारी मूग डाळही ८० रुपयावरून १००-११० रुपयांपर्यंत वधारली आहे. डाळी खरेदी करतानाही व्यापाऱ्यांची कसरत होत आहे.
आॅरगॅनिक तूरडाळ ही पांढऱ्या रंगाची असते. ती आणखीनच महाग आहे. तेलात पॉलीश केलेली तूरडाळ व मशीनवर पॉलीश केलेली तूरडाळही बाजारात उपलब्ध आहे. त्यांचेही दर कडाडले आहेत. त्यांचीही हीच स्थिती आहे.
डाळींमध्ये पूरण आणि वरण या दोन्हीसाठी तूरीच्या डाळीला पसंती दिली जाते. ती तिच्या गुळचट चवीमुळे. त्या खालोखाल मूग, हरभरा उडीद, मठ, मसूर या डाळींना मागणी असते. परंतु आता तूरीची डाळ महागल्यामुळे त्यातल्या त्यात स्वस्त असणाऱ्या हरभऱ्याच्या डाळीचा वापर करण्यावाचून आता जनतेला पर्याय उरलेला नाही. अॅसिडीटी आणि गॅस तसेच मधुमेह याच्या रुग्णांसाठी मूगाची डाळ उपयुक्त मानली जाते. परंतु तिचेही भाव कडाडल्यामुळे आता करावे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.