"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:06 IST2025-10-20T12:02:59+5:302025-10-20T12:06:53+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात बोलताना त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यावरुन एक विधान केलं आहे. नगरविकास खाते असल्याने पैशांचा काही तुडवडा येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याने त्याची आता चर्चा सुरु झालीय. तसेच राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्री असताना चालना दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख मिळाल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील 'दिवाळी पहाट' कार्यक्रमात बोलताना त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून विकासासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही, असे मोठे विधान केले आहे. ठाण्यातील रहेजा गार्डन्स येथे झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.
"पैशांची चिंता नाही, विकास हाच अजेंडा"
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "जी काही उर्वरित कामे आहेत, ती पूर्ण केली जातील. आपल्याकडे नगरविकास खाते असल्याने पैशांचा काही तुटवडा येणार नाही. विकास प्रकल्पांना जे जे आवश्यक असेल, ते पूर्ण केले जाईल." नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू न देण्याचा त्यांचा विश्वास आता चर्चेचा विषय बनला आहे.
माजी मुख्यमंत्री म्हणून कामाचा अभिमान
राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करताना केलेल्या कार्याचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. "राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना आपण चालना दिली. तसेच, कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या," असे ते म्हणाले. "पदे येतात आणि जातात, त्याची मला चिंता नाही. अडीच वर्षाच्या काळात या राज्यासाठी खूप कामे करू शकलो याचा मला अभिमान आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र एक नंबर ठेवण्याचे भाग्य मला मिळाले," असेही ते म्हणाले.
'करोडो बहिणींचा भाऊ' ही मोठी ओळख
राजकीय कार्याच्या पलीकडे, कामामुळे मिळालेल्या लोक-ओळखीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "कामामुळे लाडक्या बहिणींचा भाऊ ही सर्वात मोठी ओळख मला मिळाली," असे भावनिक विधान त्यांनी केले.
पर्यावरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
यावेळी त्यांनी वातावरणातील बदलांवरही चिंता व्यक्त केली. मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस अजूनही थांबलेला नाही, त्यामुळे पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिंगकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ठाण्यात कोलशेत येथे सेंट्रल पार्क विकसित केल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, ठाणे पालिका आयुक्तांना मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं.