No search for 61 boys, 172 girls in Thane yet | ठाण्यात ६१ मुले, १७२ मुलींचा अद्याप शोध नाही

ठाण्यात ६१ मुले, १७२ मुलींचा अद्याप शोध नाही

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील बालकांवरील होणाऱ्या अत्याचारांसंदर्भातील गुन्ह्यांत एकूण ९० टक्के दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. तसेच या वर्षातील पहिल्या १० महिन्यांत अपहरण झालेल्या बालकांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. यातील एकूण २७३ मुलांपैकी ६१ मुले आणि ५३० मुलींपैकी १७२ मुली अद्यापही मिळून आल्या नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.
१४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकांची सुरक्षितता (बालकांचे हक्क व सुरक्षितता) यासंदर्भात जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार असून यामध्ये बालकांसंदर्भातील विविध कायदे, अल्पवयीन गुन्हेगार, बालकांचे हक्क, बालकामगार, बालविवाह, बालकांवरील लैंगिक अत्याचार, मादकद्रव्यांचा गैरवापर आणि त्यांचा दुष्परिणाम या विषयावर जनजागृती केली जाणार आहे. तसेच बालकांवरील होणारे अत्याचार समजून घेणे त्याबाबतची दखल घेणे व ते प्रतिबंध करण्याकरिता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाणे व गुन्हे शाखास्तरावर बालकांचे संरक्षणाकरिता पोलीसकाका आणि पोलीसदीदी हे कार्यरत असून ते बालकांवरील होणारे अत्याचार व त्यांची सुरक्षितता याबाबत लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.
>२०१९ च्या १० महिन्यांतच अपहरणाचे ८०३ गुन्हे
शहर आयुक्तालयात २०१८ मध्ये एकूण ३६५ मुलेद्व तर ६६० मुलींचे अपहरण झाले असून त्यापैकी ३२७ मुले आणि ५७८ मुलींचा शोध लागला तर ३८ मुले आणि ८९ मुली अद्यापही मिळून आलेल्या नाहीत. तसेच २०१९ च्या पहिल्या १० महिन्यांत (जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत) २७३ मुले आणि ५३० मुलींचे अपहरण झाले आहे. तर, २१२ मुले आणि ३५८ मुली स्वगृही परतल्या आहेत. तसेच ६१ मुले आणि १७२ मुलींचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.

Web Title: No search for 61 boys, 172 girls in Thane yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.