"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका
By अजित मांडके | Updated: July 7, 2025 17:58 IST2025-07-07T17:57:46+5:302025-07-07T17:58:27+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र त्यावर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राज ठाकरे आमच्याबद्दल काहीही बोलले नाहीत, त्यामुळे आम्ही देखील त्यांच्याबद्दल बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत शनिवारी हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी उध्दव सेना आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील प्रवक्ते आणि नेत्यांना राज ठाकरे यांच्यावर कोणत्याही प्रकारची टिका किंवा बोलू नये असे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परंतु म्हस्के यांनी याचे स्पष्टीकरण केले आहे.
मेळाव्यात राज ठाकरे यांनी न कोणता झेंडा फक्त मराठीचा अजेंडा अशा स्वरुपात आपले भाषण केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी मात्र शिंदे सेनेवर आगपाखड केल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता राज ठाकरे यांच्यावर किंवा यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली, मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केले, उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आल्याची टीका म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना केली.
राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी अतिशय गलिच्छ पद्धतीने भाषण करुन उसन अवसान आणले, महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असे भडकावून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टिकाही त्यांनी केली. मराठी माणसांना भडकावून त्यांची मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश असल्याचे दिसून आले. तुमची एक हिंदी भाषिक खासदार आहे. प्रियांका चुर्तुवेदी यांना दोन शब्द मराठीत बोलता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
दोन महिन्यापूर्वीच मी सांगितले होते, की शिल्लक सेनेत कोणीही राहणार नाही, शनिवारी झालेल्या मेळाव्यात किती आमदार, खासदार उपस्थित होते, याचे उत्तर त्यांनीच द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी म्हस्के यांनी राऊत यांचाही समाचार घेतला, राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांचे वाटोळे केल्याची टिकाही त्यांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत नेऊन काय वाटोळं केल हे सर्वांना माहित आहे, आता त्यांना काँग्रेस सोबत राहायचं आहे का, आणि काँग्रेसला यांच्यासोबत राहायचं आहे का असा प्रश्न राहिलेला आहे.