'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:24 IST2025-12-18T15:21:19+5:302025-12-18T15:24:38+5:30
Thane Municipal Election 2026: मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पण, ठाण्यात याला भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे.

'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
Thane Municipal Election Shiv Sena BJP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या लढवल्या होत्या. पण, महापालिका निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपने मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात मात्र याला विरोध होताना दिसत आहे. आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा, असा सूर आता पदाधिकाऱ्यांकडून लावला जात आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिवसेनेत शीत युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपने ठाण्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारी फोडले. इतर ठिकाणीही हाच पॅटर्न राबवला गेला. तेव्हापासूनच ठाण्यात शिवसेना भाजपमधील राजकीय तणाव कमी झालेला नाही.
१८ प्रांत अध्यक्षांचे जिल्हाध्यक्षांना पत्र
भाजपने स्वबळाची तयारी करण्याचे सांगितल्यानंतर इच्छुकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काम केले. पण, पक्षाने आता युती जाहीर केली आहे. त्यामुळे अनेकांची संधी हुकणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा विरोध केला जात असल्याची चर्चा आहे.
ठाण्यातील भाजपच्या १८ प्रांत अध्यक्षांनी एकमताने भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना पत्र पाठवले आहे. युती नको, अशीच भूमिका त्यांनी मांडली आहे.
युतीमुळे भाजपला नुकसान होऊ शकते. आम्ही स्वबळावर लढण्याची ताकद राखतो. मागील काळात कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षांची आठवण ठेवा, असे पत्रात म्हटले आहे.
आमदारांची घेतली भेट
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी युती झाली, तर काम करणार नाही, असे म्हणत नाराजी बोलून दाखवली.
याबद्दल भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, "कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट आहे, युती नको. पण, शेवटी वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल. नाराज पदाधिकाऱ्यांची समजून घालण्याचा आम्ही प्रयत्न करू."