बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
By पंकज पाटील | Updated: April 26, 2025 15:56 IST2025-04-26T15:54:14+5:302025-04-26T15:56:17+5:30
Mumbai Local trains badlapur News: फलाट क्रमांक एकवर ग्रील लावल्याने 'पिक अवर'ला लोकल रेल्वेत चढणाऱ्या व उतरणाऱ्यांची प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
- पंकज पाटील, बदलापूर
बदलापूर येथे होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सोयीसाठी नव्हे, तर गैरसोयीसाठी उभारण्यात आल्याची प्रवाशांची भावना बळावत आहे. होम प्लॅटफॉर्ममुळे गर्दी विखुरली जाईल, अशी अपेक्षा असताना रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ बंद केल्यामुळे संपूर्ण प्रवाशांची गर्दी आता होम प्लॅटफॉर्मवर होत आहे. त्यामुळे सायंकाळी लोकल होम प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर प्रवाशांना स्टेशनबाहेर निघण्यासाठी वेळ लागतो. गर्दी प्रचंड झाल्यामुळे चेंगराचेंगरीची भीती वाढली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बदलापुरातील होम प्लॅटफॉर्म सध्या बदलापूरकरांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. या होम प्लॅटफॉर्मची उभारणी करत असताना रेल्वेचे नियोजन चुकल्याचे दिसते. त्यामुळे आता प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बदलापूर लोकलमधून उतरलेले प्रवासी कर्जत लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत आहेत.
त्याचवेळी कर्जतहून मुंबईकडे जाणारी मेल, एक्स्प्रेस गाडीखाली येऊन प्रवासी चिरडले जाण्याची दाट शक्यता आहे. वेळेवर लोकल सेवा सुरू असल्यास गर्दी कमी होत राहून चेंगराचेंगरीचा धोका काहीसा कमी होतो.
रेल्वेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका
४० हजार प्रवाशांची रोज बदलापूर स्थानकातून ये-जा सुरू असते. पण प्रवाशांच्या तुलनेत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.
होम प्लॅटफॉर्म अरुंद
होम प्लॅटफॉर्मची उभारणी करताना जागेअभावी प्रशासनाने हा होम प्लॅटफॉर्म अरुंद उभारला. मात्र, प्रवाशांना दोन्ही ठिकाणी उतरण्याची संधी असल्यामुळे समस्या जाणवली नाही.
आता फलाट क्रमांक १ वर ग्रील लावल्यामुळे होम प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढली आणि या वाढलेल्या गर्दीमुळे होम प्लॅटफॉर्म अरुंद वाटत आहे. यामुळे दुर्घटना घडू शकते.
चेंगराचेंगरीची भीती
सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर बदलापूर लोकल आल्यानंतर लोकलमधून उतरण्यासाठी प्रवाशांना जागा शिल्लक राहत नाही. संपूर्ण होम प्लॅटफॉर्म तुडुंब भरत असल्यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.