भिवंडीत रेल्वे प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता सुरू आहे मनमर्जी कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:12 IST2021-05-26T19:07:36+5:302021-05-26T19:12:24+5:30
Railway Project in Bhiwandi : भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही.

भिवंडीत रेल्वे प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता सुरू आहे मनमर्जी कारभार
नितिन पंडीत
भिवंडी - वसई रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पनवेल -भिवंडी - वसई या मार्गावर दोन नव्या रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. सध्या या मार्गात जमीन अधिग्रहण व माती भराव असे काम सुरू आहे. मात्र माती भराव करणाऱ्या ठेकेदारांनी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही दखल घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.
भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही. विशेष म्हणजे माती भराईसाठी खोदलेल्या या खड्ड्यात कंत्राटदाराने माती भराई केली नाही त्याच बरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा देखील या खड्डयाभोवती केलेली नाही. त्यातच मागील आठवड्यात पडलेल्या पावसात हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला असून या खड्ड्याला तलावाचे रूप आले आहे, विशेष म्हणजे या खोदकामाच्या बाजूला नागरिकांची घरे असून लहान मुले या खड्ड्यात दगड फेकायला जात आहेत. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर या मार्गावर खारबाव तसेच भिवंडी रोड रेल्वे पुलाचे त्याच बरोबर छोट्या मोठ्या मोरीपूल तसेच वडघर येथील स्मशान भूमीजवळील पुलाचे काम देखील अपूर्ण आहे. मात्र ही कामे अपूर्ण असतांनाही या मार्गावर माती भराव करण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने वडघर येथे मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात सुरुवात केली आहे. हे माती भरावाचे काम करतांना संबंधित कामाचा ठेका घेणाऱ्या प्रसाद इन्फ्रा या कंपनीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात पाण्याच्या निचरा होण्याकडे पुरता दुर्लक्ष करून माती भराव केल्याने याठिकणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. त्याकडे देखील ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे माती भरावाचे काम करणाऱ्या प्रसाद रोड अँड इन्फ्रा या ठेकेदाराला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश करावे अशी मागणी वडघर ग्रामस्थांनी भिवंडीचे प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांच्यासह तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे केली आहे.