neglecting security measures in the House in Ambarnath and Badlapur | अंबरनाथ, बदलापुरात सभागृहांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष

अंबरनाथ, बदलापुरात सभागृहांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष

अंबरनाथ आणि बदलापूरमधील अनेक सभागृह सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. शहरात अनेक हॉल नव्याने उभारण्यात येत आहेत. नवीन हॉलमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात येतात. मात्र, त्यानंतर हॉल जसजसा जुना होत जातो, तसतसे सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत जाते. शहरात आजघडीला लहानमोठे असे अंबरनाथमध्ये २२ हून अधिक हॉल आहेत. तर, बदलापूरमध्ये हीच संख्या २५ च्या घरात आहे. मात्र, त्यातील निम्मे हॉल हे सुरक्षित नसल्याचे दिसते.

अंबरनाथमध्ये स्टेशन परिसरात बी केबिन रोडवर असलेल्या तळमजल्यावरील हॉलमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग नाही. एकच प्रवेशद्वार असल्याने त्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नाही. या ठिकाणी अपघात घडल्यास त्यांची सुटका करणेही अवघड होऊ शकेल. हीच परिस्थिती अंबरनाथच्या हुतात्मा चौकातील एका बड्या सभागृहाची आहे. नवीन इमारत असतानाही त्या ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

बाहेर पडण्याचा मार्ग एक च असल्याने त्या ठिकाणीही अपघात झाल्यास अनेकजण अडकण्याची शक्यता आहे. अनेक लग्न समारंभांसाठी हे हॉल दिले जातात. मात्र, हे देत असताना कार्यक्रमाला येणारे किंवा लग्न समारंभाला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसोबत खेळण्याचे काम होत आहे. त्यातच या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने हॉलमध्ये येणारे नागरिक आपली गाडी रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत अग्निशमन यंत्रणा पोहोचणेही अवघड जाणार आहे.

अशीच परिस्थिती ही याच भागातील एका दुसºया एका सभागृहाची आहे. हॉटेलच्यावर असलेल्या या लहानशा हॉलमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यान्वित नाही. त्यामुळे हे सभागृहही सुरक्षित राहिलेले नाही. अंबरनाथच्या वडवली चौकातील एका संस्थेच्या हॉलचीही तीच अवस्था आहे. या हॉलला अनेक प्रवेशद्वार आहेत. मात्र त्या ठिकाणी अग्निसुरक्षेची कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे वरवर हॉल सुरक्षित वाटत असला, तरी त्या ठिकाणी सुरक्षेचा खेळ मांडण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक २४ तास असल्याने काही अंशी सुरक्षेकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहे. याच भागात इमारतीच्या बेसमेंटमध्ये सभागृह उभारण्यात आले आहे.

मात्र, या ठिकाणी जाण्याचा आणि येण्याचा मार्ग एकच आहे. त्यामुळे तेही सुरक्षित नाही. या ठिकाणी अनेक लग्नसमारंभ आणि कार्यक्रम होतात. याच भागात एका मंदिराचा हॉलही आहे. या ठिकाणी आपत्कालीन मार्ग असला तरी सुरक्षेची कोणतीच साधने नाहीत. अशाच प्रकारचा एक हॉल साई सेक्शन भागातही आहे. त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, त्या ठिकाणी अग्निसुरक्षेची कोणतीच साधने नाहीत. या हॉलला २४ तास सुरक्षारक्षक देण्यात आला आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील स्टेशन रोडवरच दोन हॉल उभारण्यात आले आहेत. इमारतीच्या छतावर हे हॉल तयार केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीच सुरक्षा नाही. तसेच त्या ठिकाणी अग्निसुरक्षेची कोणतीच साधने उपलब्ध नाहीत. अशीच परिस्थिती चिंचपाडा भागातील हॉलची आहे. या ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ती यंत्रणा सुरू नाही. त्यामुळे ते हॉलही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. विम्कोनाका परिसरात एका सिनेमागृहाच्या बाजूला उभारण्यात आलेले सभागृहही धोकादायक आहे. या ठिकाणी एकच मार्ग आहे. आपत्कालीन मार्ग नसल्याने त्या ठिकाणी अपघात घडल्यास अनर्थ घडू शकतो.

बदलापूरमध्येही हीच परिस्थिती आहे. अगदी स्टेशनला लागून असलेल्या एका प्रसिद्ध हॉलची अवस्थाही सुरक्षेच्या बाबतीत कूचकामी ठरत आहे. या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्गच नाही. तर, अग्निसुरक्षेची यंत्रणाही उपलब्ध नाही. बदलापूरमधील गांधी चौकातील एका हॉलची तसेच कात्रप चौकातील एका हॉलची अवस्थाही तशीच आहे. बहुमजली इमारतीत असल्याने त्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग मात्र एकच आहे. त्यातच अग्निसुरक्षेची यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसते. बदलापुरातील बसआगारासमोरच असलेल्या हॉलमध्ये जाण्यायेण्याचा मार्ग एकच आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्गच नाही. तसेच त्या ठिकाणी अग्निसुरक्षेची कोणतीच यंत्रणा नाही.

Web Title: neglecting security measures in the House in Ambarnath and Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.