भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष; नदीला हिरव्या जलपर्णीचा विळखा
By नितीन पंडित | Updated: February 23, 2023 17:54 IST2023-02-23T17:54:21+5:302023-02-23T17:54:58+5:30
भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीकडे सध्या प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.

भिवंडीतील कामवारी नदीच्या स्वच्छतेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष; नदीला हिरव्या जलपर्णीचा विळखा
भिवंडी- भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीकडे सध्या प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात अतिक्रमण केले असून शेलार मीठ पाडा नजीकच्या डाईंग साईजिंग कंपन्यांचे केमिकल मिश्रित घातक पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने कामवारी नदी प्रदूषित झाली आहे.
शहरातील नदी नाका परिसरात असलेल्या गणेश घाटाच्या चहूबाजूला या नदीवर हिरव्या जलपर्णींचा खच पडला असून दुसऱ्या बाजूला खाडीपात्रात मिळणाऱ्या नदीची पार गटारगंगा बनली आहे. विशेष म्हणजे या नदीच्या दुरावस्तेकडे स्थानिक महानगरपालिका प्रशासनासह, प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक ग्रामपंचायतींचे व महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून सेवाभावी संस्था देखील या नदीच्या पुनर्जीवनासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नसल्याने कामवारी नदी नदी सध्या मरणासन्न अवस्थेत आहे.