पेट्राेल, डिझेल महागाईविरोधात शरदचंद्र पवार गटाचे ठाण्यात तीव्र आंदाेलन!

By सुरेश लोखंडे | Updated: April 18, 2025 18:22 IST2025-04-18T18:21:20+5:302025-04-18T18:22:22+5:30

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करून ठाणेकरांसह शासनाचे लक्ष वेधून घेतले.

ncp sp group intense agitation in thane against petrol diesel inflation | पेट्राेल, डिझेल महागाईविरोधात शरदचंद्र पवार गटाचे ठाण्यात तीव्र आंदाेलन!

पेट्राेल, डिझेल महागाईविरोधात शरदचंद्र पवार गटाचे ठाण्यात तीव्र आंदाेलन!

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत असल्यामुळे खाद्यतेल, इंधन, सिलिंडरचे दर वाढत असल्याचा आराेप करून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करून ठाणेकरांसह शासनाचे लक्ष वेधून घेतले.

येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या कार्यकर्त्यांनी विविध पाेस्टर हाती घेऊन राज्य व केंद्र शासनाचा महागाई विराेधात निषेध व्यक्त केला. या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ॠता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शने करीत पेट्राेल, डिझेलसह अन्यही महागाईकडे लक्ष वेधले.

गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत. तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र, त्याचे कोणतेही सोयरसुतक सरकारला नाही, असा आरोप करीत या कार्यकर्त्यांनी ठाण्यात हे तीव्र आदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात, गाड्या घ्या..! सायकली द्या; महागाई कशासाठी..! गद्दारांच्या सोयीसाठी; ५० खोके महागाई ओके; महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी; बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार; सरकार खाते पेट्रोल वर दलाली.. डायन झाली महागाई; भ्रष्ट झाले सरकार.. म्हणून झाला महागाईचा हा हा कार , अशा विविध घोषणा देत आज हे आंदाेलन छेडले.

या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थ पडली आहे. आपल्या देशातील महागाई कमी करण्याचे कोणतेही धोरण आखले जात नाही. आता महागाई कमी करण्यासाठी जनतेने काय करावे, हे तरी सरकारने सांगायला हवेय. आपल्या देशाने अमेरिकेच्या टेरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आपले नेतृत्व अमेरिकेला घाबरते की काय, हे माहित नाही. मात्र, हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्युपंथाला लागले आहेत. त्याचे कोणतेही सोयरसुतक या सरकारला नाही, असे शासना विराेधी आराेप ॠता आव्हाड यांनी करून उपस्थिताना मार्गदर्शन केले.

सध्या पेट्रोल आणि डिझेलवर कंपन्यांकडून प्रति लिटर १५ रुपयांची बक्कळ कमाई होत आहे तर, सामान्यांच्या खिशातून राजरोस लूट केली जात आहे; सध्या कच्या तेलाच्या किंमती चार वर्षांच्या निचांकी पातळीवर आहे. तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करीत असल्याचा आराेप सुहास देसाई यांनी यावेळी उपस्थितां समाेर करून महागाई विराेधात शासनाचा तीव्र निषेद केला. यावेळी प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्यासह अन्यही पदाधिकाऱ्यांनी आपले मनाेगत व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाचे वाभाडे काढले.

Web Title: ncp sp group intense agitation in thane against petrol diesel inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.