Naveen shekharappa:'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:47 IST2022-03-02T17:46:47+5:302022-03-02T17:47:53+5:30
Naveen shekharappa: महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पटोले ठाण्यात आले होते

Naveen shekharappa:'मोदींना उशिरा जाग आली, युक्रेनमधून इतर देशांनी नागरिकांना आधीच मायदेशी आणले'
ठाणे : एखाद्याने टिका केली तर त्याविरोधात व्यक्तीगत जाऊन कारवाई करणे हे लोकशाहीला न परवडणारे आणि भुषणावही देखील नाही. त्यामुळे, भाजपने या ब्लॅकमेलींगच्या धंद्यातून बाहेर यावे, केंद्रात आलेल्या भाजप सरकारला सत्तेचा माज आहे. तो कमी करावा असा सल्लाच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. दुसरीकडे नवाब मलिक यांच्याबाबत बोलतांना सरकार आणि संघटनमध्ये फरक असल्याचे सांगत त्यांचा निर्णय घेण्यास किंवा उत्तरे देण्यास सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यास होत असलेल्या विलंबावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पटोले ठाण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅलीही काढण्यात आली होती. या रॅलीतही ते सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपवर टिका केली. अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडले जावेत, सोडविले जावेत अशी अपेक्षा असते. मात्र, भाजपची गोंधळ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण, विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत सरकार उत्तरे देण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदींना उशिरा जाग आली
केंद्रातील भाजप सरकार हे कोरोनाच्या काळ असेल, दुसऱ्या लाटेचा प्रभाव असेल किंवा युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेले युध्द असेल या काळात देशाचे पंतप्रधान हे पाच राज्याच्या निवडणुकीत व्यस्त होते. त्यात मंगळवारी एका मुलाचा मृत्युदेखील झाला. येथे शिक्षणासाठी गेलेल्या इतर देशांनी आधीच त्यांच्या नागरिकांना मायदेशात आणले. मात्र, मोदींना उशिराने जाग आल्याचेही त्यांनी सांगितले. आता उशिर झाला असला तरी देखील ही सर्व मुले सुरक्षित भारतात यावीत ही काँग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच केंद्रातील भाजप सरकार हे सत्तेचा दुरुपयोग करण्याचे काम करीत असून भाजप सर्वात मोठी भ्रष्टाचारी पार्टी देशात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमान तळाला द्यावे यासाठी निवदेन प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार सरकारने त्याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आर्यन खानवरील कारवाई हा निवडणुकीचा फंडा
केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर याचे परिणाम व्हावेत, यासाठी आर्यन खानवर बळजबरीने ड्रग्जचे गुन्हे दाखल केले होते. हा निवडणुकीसाठीचाच एक फंडा असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुस्लिम आणि हिंदु वाद करुन उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होता.
दरम्यान, यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावरुन छेडले असता, वेळ आल्यावर त्यांच्यावर बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसीबाबत उद्या निकाल येणे अपेक्षित आहे. परंतु ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचाच महापौर, उपमहापौर येथे बसेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. आता ओबीसींच्या भावना जाणून घेतल्या असून हा समाज आता काँग्रेसच्या बाजूने उभा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आधीच आम्ही आमची भुमिका स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार व्युव्ह रचना आखली जात असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.