राष्ट्रवादीत पेटला अंतर्गत कलह; दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 12:52 AM2018-09-08T00:52:42+5:302018-09-08T00:52:56+5:30

२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असताना ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत कलह पेटला आहे.

Nationalist ruckus under PETA; Ten corporators took a meeting with Pawar | राष्ट्रवादीत पेटला अंतर्गत कलह; दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

राष्ट्रवादीत पेटला अंतर्गत कलह; दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

Next

ठाणे : २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असताना ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत कलह पेटला आहे. या पक्षाच्या ३५ पैकी १० नगरसेवकांनी एकजूट करून आ. जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आव्हाडांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या नेत्यानेच या गटाचे नेतृत्व करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे.
ठाण्यात राष्टÑवादी काँग्रेसचे ३५ नगरसेवक आहेत. शिवसेनेनंतर दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्टÑवादी काँग्रेसकडे बघितले जाते. आंदोलने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ठाण्यात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम आजही सुरू आहे. अशा स्थितीत ३५ पैकी १० नगरसेवकांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या भेटीमागचे कारण लोकांना दाखवण्यासाठी वेगळे असले, तरी प्रत्यक्षात या भेटीदरम्यान नगरसेवकांनी आव्हाड आणि परांजपे यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात निवडणुका असून पक्षाला सक्षम नेतृत्व नसल्याचा आरोप करून या गटाने आव्हाड आणि परांजपेंच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. पक्ष वाढण्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोप करून शहराध्यक्ष बदलण्यासह इतर मागण्यासुद्धा त्यांनी केल्या.
आश्चर्य म्हणजे या १० नगरसेवकांचे नेतृत्व हे आव्हाडांच्या अगदी जवळचे, त्यांचे खंदे समर्थक नजीब मुल्ला यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि इतर नगरसेवकांचाही समावेश होता. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नजीब मुल्ला यांच्यासाठी आव्हाड यांनी परिश्रम घेतले होते, हे विशेष. आनंद परांजपे आणि मिलिंद पाटील यांच्यामुळे पक्षाची वाताहत झाली आहे. या दोघांनी पक्ष विकायला काढला असल्याचा स्पष्ट आरोपही यावेळी करण्यात आला. नजीब मुल्ला यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. मी शरद पवार यांना प्रत्येक आठवड्यात भेटतो. मी केवळ ठाण्याचा नव्हे तर राज्याचा नेता आहे. पवार यांच्या भेटीमध्ये ठाण्याच्या कोणत्याही नेत्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा दावा मुल्ला यांनी केला.

१० नाराज नगरसेवकांना त्यांचे गा-हाणे लेखी स्वरूपात देण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे, नगरसेवकांना त्यांचे म्हणणे गणेश नाईक यांच्याकडे देण्यास पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी उवाच...

आम्ही नेहमीप्रमाणे पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. कुणाला पक्षातून काढण्याच्या मागणीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी त्यांची भेट घेतली नव्हती.
- हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक

या बैठकीचे मला निमंत्रण नव्हते. त्यामुळे तिथे काय झाले, याची मला कल्पना नाही. पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार मी पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.
- आनंद परांजपे, शहराध्यक्ष

प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते. परंतु, ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, याचा विचार ज्याचा त्यानेच करावा.
- जितेंद्र आव्हाड, आमदार

ज्यांच्या कृत्यामुळे पक्षाची वाताहत झाली, त्यांनीच अशा प्रकारे इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे. दुसºयाकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्याकडे असतात, हे त्यांनी विसरू नये.
- मिलिंद पाटील,
विरोधी पक्षनेते, ठामपा

Web Title: Nationalist ruckus under PETA; Ten corporators took a meeting with Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.