राष्ट्रीय पुरस्कार विजेतीवर उपासमारीची वेळ; गवत विकून भागवते कुटुंबाचा उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:30 IST2025-08-22T13:28:27+5:302025-08-22T13:30:21+5:30

३१ वर्षाची हाली सध्या बेरोजगारीच्या गर्तेत सापडली आहे

National Award winner faces hunger; sells grass to support family | राष्ट्रीय पुरस्कार विजेतीवर उपासमारीची वेळ; गवत विकून भागवते कुटुंबाचा उदरनिर्वाह

राष्ट्रीय पुरस्कार विजेतीवर उपासमारीची वेळ; गवत विकून भागवते कुटुंबाचा उदरनिर्वाह

लोकमत न्यूज नेटवर्क, कसारा (जि. ठाणे) : शहापूर तालुक्यातील हाली बरफ या आदिवासी कन्येने लहान वयात स्वतःच्या बहिणीचे प्राण बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले होते. या पराक्रमाबद्दल तिला २०१३ रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते 'राष्ट्रीय शौर्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तिच्या शौर्याची नोंद आजही शालेय पाठ्यपुस्तकांत आहे; पण... सध्या हीच ३१ वर्षाची हाली सध्या बेरोजगारीच्या गर्तेत सापडली आहे.

हाली गेल्या काही वर्षांपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूरअंतर्गत खर्डी येथील मुलींच्या वसतिगृहात रोजंदारीवर काम करत होती. त्याआधी तिने पेंढरघोळ येथील शासकीय आश्रमशाळा आणि शासकीय मुलींचे वसतिगृह शहापूर येथेही सेवा बजावली; परंतु मागील सहा महिन्यांपासून तिच्या हाताला काम नाही. परिणामी, जगण्यासाठी तिला गावागावांत मजुरी करावी लागत आहे.
जंगलातील गवत कापून ते विकून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.

रोजगार द्या...

एकीकडे स्वतःच्या बहिणीचे प्राण वाचविणाऱ्या आणि बिबट्या झुंज देणाऱ्या या धाडसी आदिवासी कन्येला देशभरातून गौरविले जाते, तिच्या शौर्यकथेवरून विद्यार्थी प्रेरणा घेतात; परंतु शासनाने तिला आजवर कायमस्वरूपी नोकरी वा रोजगाराचा आधार दिला नाही.
श्रमजीवी संघटनेने यासंदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रभारी प्रकल्पाधिकारी दिवाकर काळपांडे यांना निवेदन सादर केले.
हाली बरफला तातडीने कायमस्वरूपी नोकरी द्यावी किंवा सरकारी सेवेत समाविष्ट करून तिच्या शौर्याचा सन्मान करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: National Award winner faces hunger; sells grass to support family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.