सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:49 IST2018-01-18T19:40:50+5:302018-01-18T19:49:57+5:30

The Narkata of Power: Anoopo Shraddha movement of BJP in the light | सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

ठळक मुद्देविकासकामांतील चालढकलीविरोधात कार्यकर्त्यांनी केले मुंडणमे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपाने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे, अंकुश मढवी, नरेश कदम यांनी मुंडण केले.
मुंब्रादेवी कॉलनी रोडसाठी सुमारे ९ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहे. तीन महिने होऊनही १० टक्के काम झालेले नाही. निधी मंजूर आहे, वर्क आॅर्डर मिळाली आहे, तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी शिवसेना मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत मुंब्रादेवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, त्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपा कार्यकर्त्यांनी ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडण केले. याप्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, अ‍ॅड. आदेश भगत, निलेश पाटील, रोशन भगत, सचिन भोईर, गणेश भगत आदी उपस्थित होते.
दिवा शहरात सत्ताधा-यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडरसाठी कामे केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. गणेशनगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नाहीत, या रस्त्याच्या कामाला सुरु वात कधी करणार, असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी दिव्यातील नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला.
मे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे. दिव्यातील सर्व मुख्य रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी अ‍ॅड. आदेश भगत यांनी केली आहे.

Web Title: The Narkata of Power: Anoopo Shraddha movement of BJP in the light