उल्हासनगरात माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीकडून गुंतवणुकदाराकांची फसवणूक, ९ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:24 IST2025-08-02T18:23:10+5:302025-08-02T18:24:58+5:30
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर कॅम्प नं-४, परिसरातील माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीच्या अध्यक्ष व संचालकावर ४ गुंतवणूकदाराकांची 1 कोटी ५ लाख ९५ हजाराने फसवणूक केल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला.

उल्हासनगरात माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीकडून गुंतवणुकदाराकांची फसवणूक, ९ जणांवर गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-४, परिसरातील माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीच्या अध्यक्ष व संचालकावर ४ गुंतवणूकदाराकांची 1 कोटी ५ लाख ९५ हजाराने फसवणूक केल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४, पेन्सिल फॅक्टरी परिसरात माय अर्बन नागरी सहकारी पतपेढी आहे. पतपेढीचे अध्यक्ष व संचालकांनी गोपाळ रामचंद्र रख्यांनी यांना आर्थिक गुंतवणूक करून आकर्षक परतावा असे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास सांगितले. गोपाळ रख्यांनी यांनी ८ ऑक्टोबर २०१८ पासून आजपर्यंत ७३ लाख ३१ हजार ४५९ रुपये गुंतविले. तसेच तिघे अन्य तक्रारदारानी ३२ लाख ६४ हजार असे एकूण १ कोटी ५ लाख ९५ हजार ४५९ रुपये गुंतविले. त्यांनी व्याज व रक्कम परत मागितली असता रक्कम परत केली नाही. तसेच पोलिसात तक्रार केल्यास आत्महत्याची धमकी पतपेढीच्या अध्यक्ष व संचालकांनी दिली. अखेर गोपाळ रख्यांनी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विठ्ठलवाडी पोलिसांनी रख्यांनी व अन्य तिघांच्या तक्रारीवरून पतपेढीचे अध्यक्ष प्रवीण प्रकाश दर्याणी, अशोक हरचंदानी, नियाती प्रवीण दर्याणी, प्रकाश दर्याणी, नयना प्रकाश दर्याणी, मेहेमोश के छायेला, हरिराम एफ खेतवानी, पुरेश व्ही गांदाणे, व भास्कर डी लांगे अश्या नऊ जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यापेक्षा जास्त गुंतवणूकदाराकांना फसविले असून फसवणुकीची किंमत्त वाढण्याची शक्यता विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी व्यक्त केली. अधिक तपास पोलीस करीत आहे.