मारहाणीच्या घटनेशी संबंधच नाही: हल्लेखोरांनीच रचले कुभांड, नगरसेवक विकास रेपाळे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 22:41 IST2017-09-26T22:41:28+5:302017-09-26T22:41:42+5:30
कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला.

मारहाणीच्या घटनेशी संबंधच नाही: हल्लेखोरांनीच रचले कुभांड, नगरसेवक विकास रेपाळे यांचा दावा
ठाणे, दि. २६ - कशिश पार्कच्या गेटवर रविवारी रात्री घडलेल्या हाणामारीच्या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नाही. याऊलट, सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव यांनीच हल्ला झाल्याचे कुभांड रचले. राजकीय सूड आणि वैयक्तिक आकसातून त्यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला. सागर मेटकरीने कसे स्वत:च डोके आपटून घेतले, याचा भंडाफोडही त्यांनी एका सीसीटीव्हीद्वारे यावेळी केला.
रविवारी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास कशिश पार्कच्या गेटसमोर वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या काही साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल आहे. हा हल्ला रेपाळे यांच्या इशाºयाने केल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्या अटकेची मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली होती.
याच पार्श्वभूमीवर रेपाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. मुळात, २४ सप्टेंबर रोजी रात्री ज्यावेळी हा मारहाणीचा प्रकार घडला त्यावेळी आपण अंधेरी येथे होतो. आपण घरी नसल्याचा फायदा घेऊन आपल्या वृद्ध आईवडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सागर मेटकरी, प्रशांत जाधव, गणेश, योगेश सदावर्ते आदींच्याविरुद्ध २४ सप्टेंबर रोजी रात्री तक्रार दाखल केली. ती दाखल होताच मेटकरी आणि धनंजय कावळे यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा कांगावा केला. प्रत्यक्षात मेटकरी आणि त्याच्या सहकाºयांमध्येच आपसात वाद होऊन त्यांनी हाणामारी केल्याचा आरोप करून तसे सीसीटीव्ही फूटेजही रेपाळे यांनी दिले. त्यानंतर कशिश पार्कच्या आवारातही मेटकरीने चार वेळा स्वत:च भिंतीवर कशा प्रकारे डोके आपटले याचेही सीसीटीव्हीतील चित्रण त्यांनी यावेळी दाखविले.
जीमच्या विरोधाचा वाद
जीमच्या विराधामुळे हा मूळ वाद असल्याचे रेपाळे यांनी यावेळी सांगितले. आपण प्रभागामध्ये नागरिकांसाठी जीमचे बांधकाम केले आहे. त्याला प्रशांत जाधव यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांचा विरोध आहे. ती बांधली जाऊ नये आणि तिला वापर परवाना देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. हा वाद न्यायालयातही सुरू आहे. ठाणे न्यायालयाने या बांधकामाला १२ एप्रिल २०१७ ला स्थगितीही दिली. पण, उच्च न्यायालयाने जून २०१७ मध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१७ रोजी स्थगिती आदेश रद्द केला. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन प्रशांत जाधव आणि त्याचे साथीदार कोणत्या ना कोणत्या मार्गे वाद घडवून आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.