बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:59 IST2025-11-05T08:58:41+5:302025-11-05T08:59:05+5:30
पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत

बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर-अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बदलापूरमधील निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. या जिल्ह्यात एकही नगरपंचायत निवडणूक या टप्प्यात होणार नाही. बदलापूरच्या निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू असून भाजप आणि शिंदेसेनेचे पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
नगर परिषदेत पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असून बदलापुरात २४ पॅनलमधून तब्बल ४९ लोकप्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची आहे. अंबरनाथमध्ये राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. येथे महायुतीमध्ये एकमत होताना दिसत नाही तर महाविकास आघाडी शेवटच्या क्षणी तडजोड करून एकत्रित निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. या शहरात २९ पॅनलमधून ५९ नगरसेवकांची निवडणूक होणार आहे. याआधी अंबरनाथ नगर परिषदेत ५७ नगरसेवक होते. नगरपरिषद हद्दीत तब्बल दोन लाख ५७ हजार मतदारांची नोंद असून, हे मतदार नेमका कौल कोणाच्या बाजूने देणार, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, मतदानाची झालेली हेराफेरी पाहता मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होणार आहे.