त्या लोकलला कॅमेरे नाहीत, सीसीटीव्ही फुटेजही नाही, अपघात कसा झाला हे शोधण्याचं रेल्वेसमोर आव्हान
By अनिकेत घमंडी | Updated: June 11, 2025 12:48 IST2025-06-11T12:48:40+5:302025-06-11T12:48:59+5:30
Mumbra Local Accident: मुंब्य्रात सोमवारी लोकलमधून १४ प्रवासी पडून झालेल्या दुर्घटनेच्या मूळ कारणाचा शोध रेल्वे पोलिस व प्रशासन यांनी सुरू केला. अपघात झालेल्या लोकल जुन्या असल्याने त्यांच्या मोटरमन, गार्ड कोचसमोर कॅमेरे बसवलेले नसल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला, याचा शोध लावण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

त्या लोकलला कॅमेरे नाहीत, सीसीटीव्ही फुटेजही नाही, अपघात कसा झाला हे शोधण्याचं रेल्वेसमोर आव्हान
- अनिकेत घमंडी
डोंबिवली/ठाणे - मुंब्य्रात सोमवारी लोकलमधून १४ प्रवासी पडून झालेल्या दुर्घटनेच्या मूळ कारणाचा शोध रेल्वे पोलिस व प्रशासन यांनी सुरू केला. अपघात झालेल्या लोकल जुन्या असल्याने त्यांच्या मोटरमन, गार्ड कोचसमोर कॅमेरे बसवलेले नसल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला, याचा शोध लावण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. जेथे अपघात घडला, त्या भागाची कसून पाहणी करण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक अहोरात्र तैनात केले होते. मंगळवारी दिवसभरात त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
अपघातात जखमी सात प्रवाशांवर ठाण्यात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री उशिरा आणखी एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने जखमींची संख्या आठ झाली. जखमींपैकी मच्छिंद्र गोतारणे या रुग्णाला मेंदूचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तीन रुग्णांवर मंगळवारी हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
लोखंडी रॉडचा फटका बसला?
एका लोकलमधून लोखंडी रॉड लागल्यामुळे अपघात झाला असावा, अशी चर्चा काही प्रवाशांत सोमवारपासून सुरू होती. त्यातील एका लोकलच्या डब्याला ओरखडे असल्याची चर्चा होती. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणच्या फलाटाचा शेवटचा भाग खचल्याची चर्चा सुरू होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी या चर्चेला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
मोटरमन, ५० प्रवाशांची चौकशी
अपघात झाला त्या लोकलच्या दोन्ही मोटरमन, गार्ड यांना मध्य रेल्वेच्या वरिष्ठांनी मुंबईत बोलवून त्यांच्याकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. दोन्ही लोकलमधील ५० प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचीही रेल्वेने मंगळवारी दिवसभर चौकशी करून त्यांचे म्हणणे
ऐकून घेतले.
अपघात घडल्यापासून तो कसा घडला असावा, यासाठी आरपीएफ, जीआरपी पोलिस यंत्रणेकडून त्याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींसमवेत चर्चा करून माहिती घेणे सुरू असून, फलाटातील कॅमेरे तपासण्यात आले, त्यातून फारसे काही स्पष्ट झाले नाही, यंत्रणांचा तपास सुरू आहे.
- अर्चना दुसाने,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे जीआरपी
रूळ, स्लीपर, खडी : हालचालींवर लक्ष
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडे विचारपूस केली. रेल्वे रुळात, त्या भागात, संबंधित लोकल गाड्यांमध्ये तांत्रिक दोष होता का, याची तपासणी रेल्वे वरिष्ठ पातळीवर करत आहे. मंगळवारी दिवसभर मुंब्रा स्थानकात प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात केला होता.
दिवसभरात जलद मार्गाने जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांचा व लोकलचा वेग ताशी ३० ते ५० किमी एवढा नियंत्रित ठेवला होता. त्या वेगावर नियंत्रण ठेवून रुळ, खडी, स्लीपरच्या हालचालींवर लक्ष देण्यात आले होते.
स्थानकातील कॅमेरे पोलिसांनी तपासले. परंतु त्यातून फारसे हाती लागले नाही. दोन लोकलच्या मधल्या भागात प्रवासी पडल्याने आणि त्या लोकल एकमेकांसमोरून गेल्याने फलाटावरील सीसीटीव्हीत अपघात चित्रित झाला नाही.