लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:00 IST2025-06-09T15:00:35+5:302025-06-09T15:00:47+5:30
Mumbai Train Accident: दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारुन जात असतानाच हा भीषण अपघात झाला. एक लोकल कसाऱ्याकडे तर दुसरी कसारा लोकल ही सीएसएमटीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेतील जखमी मच्छिंद्र गोंधणे यांनी आपबिती सांगितली आहे.
पोलला पकडले नसते तर...
मच्छिंद्र गोंधणे सांगतात की, 'मी सात आठ वर्षांपासून मुंबई लोकलने प्रवास करतो, पण अशी घटना पहिल्यांदाच पाहिली. मी रोजप्रमामे आज सकाळी नोकरीसाठी ठाण्याकडे निघालो होतो. दोन्ही बाजूने येणाऱ्या फास्ट लोकल होत्या. दोन्ही ट्रेन जेव्हा एकमेकांच्या अगदी जवळ आल्या, त्यावेळी ही घटना घडली. सुदैवाने मी ट्रेनमधील पोलला घट्ट पकडून होतो, त्यामुळे मी ट्रेनमधून बाहेर पडलो नाही. पण, या गोंधळात माझा पाय कुठेतरी अडकून फ्रॅक्चर झाला,' अशी प्रतिक्रिया मच्छिंद्र यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. ट्विटमध्ये ते म्हणाले, "दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे."
मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे
1. केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)
2. राहुल संतोष गुप्ता
3. विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
4. अज्ञात व्यक्ती
जखमी व्यक्तींची नावे
1. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आटगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)