Mumbai CST Bridge Collapse: तिन्ही परिचारिकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 06:11 IST2019-03-16T06:11:21+5:302019-03-16T06:11:34+5:30
मैत्रिणींवर एकाच वेळी घाला; प्रभू, शिंदे, तांबे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

Mumbai CST Bridge Collapse: तिन्ही परिचारिकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ असलेला पादचारी पूल कोसळून गुरुवारी डोंबिवली पश्चिमेतील रंजना तांबे (४५), अपूर्वा प्रभू (३५), भक्ती शिंदे (४०) यांचा मृत्यू झाला. जी.टी. रुग्णालयात परिचारिका असलेल्या या तिघींवर शुक्रवारी दुपारी शिवमंदिर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मैत्रिणी असलेल्या तिघींना एकाच वेळी मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपूर्वा या ठाकूरवाडीतील उदयराज सोसायटीत पती अभय प्रभू आणि मुलगा गणेश, मुलगी चिन्मयी यांच्यासोबत राहत होत्या. गणेश सातवीत, तर चिन्मयी पाचवीत शिकत आहे. अविवाहित असलेल्या रंजना या गणेशनगरमधील शिवसागर सोसायटीत आईसोबत राहत होत्या. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. तर, मूळच्या दापोली-पालगड येथील असलेल्या भक्ती या ओमसाई दत्त सोसायटीत पती राजेंद्र शिंदे आणि मुलगा ओम्कार यांच्यासोबत राहत होत्या. ओम्कार आठवीत शिकत आहे.
पूल दुर्घटनेत तिघींचा मृत्यू झाल्याची बातमी येताच सर्वत्र शोककळा पसरली होती. अंत्ययात्रेत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनीता राणे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचे घरी जाऊ न सांत्वन केले.