नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा
By नितीन पंडित | Updated: December 2, 2025 20:24 IST2025-12-02T20:23:36+5:302025-12-02T20:24:30+5:30
समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर या विमान तळावरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा केंद्र सरकारला भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.यावेळी नवी मुंबई येथील निलेश पाटील,सागर पाटील,गिरीश साळगावकर,धीरज पाटील,रवी मढवी,अतुल म्हात्रे रोशन पाटील हिमांशू पाटील,सुशांत पाटील,सर्वेश तरे यांसह विविध भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी १४ सप्टेंबर रोजी खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनतर विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर रोजी स्थानिक भूमिपुत्रांसोबत बैठक घेत दोन ते अडीच महिन्यात विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अश्वासनाला ३ डिसेंम्बर रोजी दोन महिने पूर्ण होणार असून २५ डिसेंम्बर रोजी हे विमानतळ उड्डाणासाठी सुरु होणार आहे.
मात्र केंद्र शासनाने अजूनही नामकरण प्रस्ताव चर्चेला आणलेला नाही व त्याबाबत कोणताही ठोस निर्णक घेतलेला नाही.त्यामुळे केंद्र शासनाची भूमिका हि स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरणारी असल्याने स्थानिक भूमीपुत्रांच्या वतीने २२ डिसेंम्बर रोजी भिवंडीतील मानकोली नाका ते नवी मुंबई विमानतळ पर्यंत पदयात्रा जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून २४ डिसेंम्बर रोजी विमानतळावर हे पदयात्रा आंदोलन पोहचणार असून २५ डिसेंम्बर रोजी या विमानतळावरून एकही विमान आम्ही उडू देणार नाही अशी भूमिका आज स्थानिक भूमीपुत्रसंघटनेच्या वतीने घेतलेल्या बैठकीत ठराव करण्यात आला असल्याची माहिती खा बाळ्या मामा यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्य सरकार केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगत आहे,पण दिल्लीत मी स्वतः मंत्रालयात चौकशी केली असता ते प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी घेतलाच गेला नसल्याचे समजले,म्हणजे सरकार जाणीव पूर्वक चालढकल पणा करीत असून भूमिपुत्रांच्या ही मागणी जाणीवपूर्वक डावलली जात असल्याने सर्व पाच ही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र समाजामध्ये प्रचंड रोष असून ,सरकारच्या हाती २० दिवस आहेत त्यादरम्यान समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.