उल्हासनगरात ठेवलेले बहुतांश हिरकणी कक्ष बेवारस
By सदानंद नाईक | Updated: March 1, 2025 17:47 IST2025-03-01T17:47:27+5:302025-03-01T17:47:36+5:30
शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात आले असून शाळा आवारातील तीन पैकी दोन हिरकणी कक्ष आजपर्यंत बंद आहेत.

उल्हासनगरात ठेवलेले बहुतांश हिरकणी कक्ष बेवारस
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका शाळा प्रांगणातील हिरकणी कक्षातील ओली पार्टीची तक्रार महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिली. याबाबत तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली असून शहरांत ठेवण्यात आलेले बहुतांश हिरकणी कक्ष बेवारस व कुलूप बंद असल्याचे चित्र आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन चौक परिसरातील महापालिका शाळा क्रं-२९ व ८ मधील आवारातील हिरकणी कक्षात ओली पार्टी झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी एकच खळबळ उडाली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याबाबत महापालिकेकडून तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी महापालिकेकडून तक्रार आल्याचे सांगून तपासाअंती गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हणाले. शनिवारी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात आले असून शाळा आवारातील तीन पैकी दोन हिरकणी कक्ष आजपर्यंत लॉकबंद आहेत. तर ज्या हिरकणी कक्षात ओली पार्टी झाल्याचे उघड झाले, त्या कक्षाचे दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत.
महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय, पोलीस ठाणे आदी ठिकाणच्या हिरकणी कक्षाचा एकदाही वापर झाला नसल्याची माहिती उघड झाली. गेल्या वर्षापासून बहुतांश हिरकणी कक्षाचा वापर झाला नसल्याने, त्यांची दुरावस्था झाली आहे. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शाळेतील प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून याप्रकरणी कारवाईचे संकेत दिले. तर उपायुक्त अजय साबळे यांनी शाळा क्रं-२९ व ८ मध्ये सुरक्षारक्षक तैनात करून सर्वच शाळेतील सिसिटीव्ही कॅमेरे बसाविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यापूर्वीही लोकसभा निवडणूक वेळी याच शाळेत विनपरवाना शिलाई मशीनचा साठा ठेवून महिलांना वाटप केल्या होत्या. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता.