ठाण्यात एकाच दिवशी दोन तरुणींचा विनयभंग : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:12 IST2018-10-12T23:07:26+5:302018-10-12T23:12:09+5:30
ठाणे स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि कापूरबावडी भागातील एका रिक्षामध्ये अनुक्रमे २५ आणि १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. स्टेशन परिसरातील घटनेत तरुणीने विनयभंगानंतर त्या तरुणाच्या श्रीमुखात लगावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठाणेनगर आणि कापूरबावडी मध्ये गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील ठाणे स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि कापूरबावडी भागातील एका रिक्षामध्ये अनुक्रमे २५ आणि १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी सुनील मोरे (४४, रा. तुळशीधाम, ठाणे) याला तर कापूरबावडी पोलिसांनी अक्षय काटे (२१, रा. विक्रोळी, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. ठाणे स्थानकाजवळील घटनेत विनयभंग करणाऱ्याला तरुणीने श्रीमुखात लगावून पोलिसांच्या हवाली केले.
पहिल्या घटनेत मुंबईच्या नायगाव भागात राहणारी २५ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसह ठाणे रेल्वेस्थानकाजवळील सॅटीस ब्रिजखाली उभी होती. त्यावेळी रंगारी काम करणाºया सुनीलने तिच्या पार्श्वभागावर टपली मारली. हा प्रकार चुकून झाला असल्याचा समज करून सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने तो पुन्हा तिथे आला. त्याने पुन्हा तसाच प्रकार करून तिचा विनयभंग केला. दुसºया वेळी मात्र तिने शांत न राहता त्याच्या श्रीमुखात लगावून आरडाओरडा केला. हा प्रकार इतरही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले.
दुस-या घटनेतील प्रकार जुलैपासून ११ आॅक्टोबर २०१८ दरम्यान सुरू होता. नवी मुंबईच्या घणसोलीतील १९ वर्षीय तरुणी आणि विक्रोळीतील अक्षय काटे (२१) हे दोघेही कापूरबावडी येथील एका मॉलमध्ये नोकरीला होते. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकापर्यंत एकत्रच रिक्षाने जाणे होत होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. तिच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्याशी अनेकदा गैरवर्तन केले. रिक्षातही त्याने तिचा विनयभंग केला. अखेर, याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध गुरुवारी तक्रार दाखल केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने त्याला अटक केली.-