कर थकवल्याने मोबाइल गॅलरीला सील, ठामपाची कारवाई, मालमत्ता केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:14 IST2018-09-07T00:14:41+5:302018-09-07T00:14:53+5:30
स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली.

कर थकवल्याने मोबाइल गॅलरीला सील, ठामपाची कारवाई, मालमत्ता केली जप्त
ठाणे : स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली.
ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीने २०१३-१४ पासून स्थानिक संस्थाकरापोटी असलेली १२.५५ कोटींची रक्कम भरली नव्हती. यासंदर्भात कंपनीला वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, रक्कम न भरता या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कोणतेही अंतरिम आदेश न दिल्याने महापालिकेने बुधवारी नौपाडा भागातील त्यांची गॅलरी सील केली. तसेच गॅलरीची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.
दरम्यान, स्थानिक संस्थाकरासाठी नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांपैकी ज्या आस्थापनांनी २०१३-१४ पासून त्यांची विवरणपत्रे दाखल केली नसतील किंवा त्यांनी विवरणपत्रे दाखल करून आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नसतील, अशा आस्थापनांनी विवरणपत्रे व करनिर्धारणेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावीत आणि पुढील कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठामपाकडून दबाव
ठाणे महानगरपालिकेने एअरटेलकडून स्थानिक संस्थाकरसारख्या काही विशिष्ट मागण्या केल्या आहेत. या मागण्यांविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून हे प्रकरण प्रलंबित आहे. तथापि, एअरटेलवर दबाव टाकून मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने आमच्या अनेक स्टोअरपैकी एक स्टोअर बेकायदेशीरपणे सीलबंद केले असल्याचा आरोप एअरटेलच्या अधिकृत निवेदनामध्ये केला आहे. आम्ही या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयाकडे निवाडा मागितला आहे. उच्च न्यायालय आमचे स्टोअर डी-सील करण्याचा आदेश महापालिकेला देईल, असा विश्वास या निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.