मनसेची ठाणे विकास आघाडी; छोटे पक्ष, इच्छुक, समाजसेवी प्रभुतींना एकत्र येण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:03 IST2022-02-02T17:02:21+5:302022-02-02T17:03:23+5:30
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजु लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता कंबर कसली आहे.

मनसेची ठाणे विकास आघाडी; छोटे पक्ष, इच्छुक, समाजसेवी प्रभुतींना एकत्र येण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजु लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता कंबर कसली आहे. छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजातील समाजसेवी प्रभुतीना सोबत घेऊन 'ठाणे विकास आघाड़ी' रिंगणात उतरवणार असल्याचे सुतोवाच मनसे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे. तसेच सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, याच निवडणुकीत ठाण्यात 'ठाणे विकास आघाडी ' मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ज्याना तिकीट मिळणार नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत अश्या सर्वांना एकत्र घेऊन ठाणे विकास आघाडी स्थापन करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीने ठाण्यात विकास आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. समाजात काम करत असणाऱ्या महत्वाच्या घटक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. आगामी पालिका निवडणुकीत ठाणे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीचे मैदान गाजवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे.