मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 11:48 IST2017-10-27T09:18:41+5:302017-10-27T11:48:17+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी सकाळी राज ठाकरे डोंबिवली दाखल झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा
डोंबिवली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी सकाळी राज ठाकरे डोंबिवली दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली मनसेचे गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या अंतर्गत बैठक सुरु आहे. सभागृहात अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला प्रवेश देण्यात आलेला नाही तसंच पोलिसांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर संध्याकाळी पाच वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
शनिवारी राज ठाकरे कल्याणमध्ये असून तेथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत . मुंबई महापालिकेत घडलेल्या मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे नऊ नगरसेवक आहेत. त्यात सुनंदा कोट या नगरसेविकेने पक्षाला अंधारात ठेवून शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग अध्यक्ष पद पटकाविले आहे. यावर ठाकरे काही भाष्य अथवा निर्णय देतात का याकडेही लक्ष लागले आहे.
राज ठाकरे हे गुरुवारी संध्याकाळी डोंबिवलीत येणार होते पण सायन दादर येथील वाहतूककोंडीत अडकल्याने ते माघारी परतले होते. पण आता शुक्रवारी सकाळीच ते डोंबिवलीत दाखल झाले आहेत.