mns leader warns mseb officers over electricity meter cut | 'वीज कापायला आलात तर मनसे स्टाइल शॉक देऊ'

'वीज कापायला आलात तर मनसे स्टाइल शॉक देऊ'

ठळक मुद्देवीजबिलाच्या संदर्भात मनसेची आक्रमक भूमिकावीजबिल भरण्यासाठी बळजबरी केल्यास गाठ मनसेशी, अविनाश जाधव यांचा इशाराराजू शेट्टी यांनीही वीजबिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला खडसावलं

ठाणे
वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. वीजबिलच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यात वीजबिल न भरल्याने वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइलनं शॉक देऊ, असा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. 

'लॉकडाउनदरम्यान जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफ व्हावं यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहीलं. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. 

 

लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, वीजबिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही, असं विधान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर वीजबिलाच्या मुद्द्यावरुन रान उठलं आहे. मनसेसोबतच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारला इशारा दिला आहे. 'आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ', अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही नितीन राऊत यांच्या भूमिकेवर 'अजब सरकारचा गजब यू टर्न', असं ट्विट करत टीका केली आहे. तर ठाणे-पालघर जिल्ह्यात कोणताही अधिकारी बळजबरीने वीजबिल घेण्यासाठी अथवा मीटर कापण्यासाठी आला तर मनसेचे कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि याची पूर्ण जबाबदारी एमएसइबीच्या अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

Web Title: mns leader warns mseb officers over electricity meter cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.