MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "भोंगे उतरवा हे सांगून समजत नसेल, तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणारच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:33 IST2022-04-12T20:32:24+5:302022-04-12T20:33:16+5:30
राज ठाकरे यांचं वक्तव्य. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे : राज ठाकरे

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "भोंगे उतरवा हे सांगून समजत नसेल, तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणारच"
"मशिदींवरील भोंग्यांबाबत आधीही बोललो होते तेव्हा अजित पवारांना ऐकू आलं नाही. मशिदींवरील भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होतोय यात धार्मिक विषय कुठे. तुम्हाला जे काही करायचंय घरात करा. शहरातील रस्ते, फुटपाछ का अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका हे जर सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच," असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ठाण्यात आयोजित उत्तर सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
"वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नाही सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकं, विद्यार्थी महिलांना याचा त्रास होतो. एकतर सगळे बेसूर असतात. काय म्हणून ते ऐकायचं. रस्त्यावर घाण झाली, रस्ता साफ करतो, फुटपाथवर घाण झाली फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजे. आम्ही यातून मागे हटणार नाही हे राज्य सरकारला सांगणं आहे," असंही राज ठाकरे म्हणाले.
"या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे"
"या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. ज्या देशात देशात बंदी आहे तिकडे निमुटपणे ऐकतात. माझे अनेक मुस्लीम मित्र आहेत, ते सांगतात तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्यांना त्रास देतो. सध्या रमझान सुरूये आम्ही समजू शकतो. आमचाही गणेशोत्सव असतो, नवरात्रोत्सव असतो. काही दिवस समजू शकतो. ३६५ दिवस या गोष्टी कोणासाठी ऐकवता. ३ तारखेला ईद आहे. राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे, दंगल, तेढ निर्माण करायचं नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवायचं नाही. १२ ते ३ मे यादरम्यान तुम्ही मौलवींना बोलवा भोंगे उतरवा हे सांगा.३ तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयानं यावर सांगितलं असेल तर राज्याच्या गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय हरकत आहे. मतांसाठी हे हव्या त्या पद्धतीनं धर्म चालवणार आणि उघड्या डोळ्यानं बघत बसायचं का? असा सवालही त्यांनी केला.