MNS agitation for toll free of vehicles in Thane city | ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन
ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली असून आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, यासाठी मानवी साखळी करून मनसेने शनिवारी आंदोलन केले. आठ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, अजूनही ठाणेकरांकडून तो घेणे सुरूच असून आमदार जनतेशी खोटं बोलत आहेत, असा आरोपही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

आनंदनगर टोलनाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी केली होती. भविष्यात ती टोलनाक्यापासून ते थेट माजिवड्यापर्यंत करण्यात येईल, असे सांगून ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मनसेचे आंदोलन असल्याने टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्तदेखील ठेवला होता. मानवी साखळी करून एमएच ०४ वाहनांना टोल बंद करावा, या आशयाचे फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले. यापूर्वी सामाजिक संघटनांनीदेखील टोलमुक्तीसाठी मानवी साखळी आंदोलन केले होते.
२०१४ मध्ये युतीचे सरकार आले, तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासनच ठरले. जनतेला टोल नको असल्याने मनसेने आता आक्र मक भूमिका घेऊन हे आंदोलन छेडले असल्याचे जाधव यांनी सांगितले. ८ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ या वाहनांना टोलमुक्त केले असल्याचे जाहीर केले होते. तशाप्रकारच्या बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आमदारदेखील खोटे बोलत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केल्यामुळे टोलवरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

ठाण्यातील नागरिकांना अर्ध्या किमीसाठी टोल भरावा लागत असून हे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दर्शन देशमुख यांनी दिली. जिथे १० मिनिटांचे अंतर लागते, तिथे या टोलनाक्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर लागत असून घरी जायला रोज उशीर होतो. त्यामुळे निदान ठाणेकरांसाठी तरी हा टोल बंद करावा, ही मनसेची मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आधीच ठामपाला कररूपाने पैसे भरतो. मात्र, आज ठाण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहीत आहे. सेवाच चांगली नसेल तर टोल तरी का द्यायचा, त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: MNS agitation for toll free of vehicles in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.