आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: जखमींची अद्याप साक्ष नाही, फरारींच्या शोधासाठी ६ पथके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 20:54 IST2024-02-04T20:53:21+5:302024-02-04T20:54:22+5:30
गोळीबार झाला त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर व पोलीस ठाणे प्रांगणात झालेल्या शिविगाळ, धक्काबुकीं व रिव्हॉल्वर काढणे आदी प्रकरणी तपास करून गुन्हे दाखल करण्याचे काम स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्याचे असल्याचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील म्हणाले.

आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: जखमींची अद्याप साक्ष नाही, फरारींच्या शोधासाठी ६ पथके
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींच्या तपासासाठी ६ पथके तैनात केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली. तसेच जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांची साक्ष घेतली नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात महेश गायकवाड व राहुल पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद राज्यासह देशात उमटले असून आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर, वैभव गायकवाड, नागेश बेडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह अन्य जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे यांच्यासह संदीप सरवनकर यांना अटक करून त्यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
आमदार गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस ठाण्याकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला असून फरार आरोपी वैभव गायकवाड, नागेश बडेकर व विकी गणोत्रा यांच्या तपासासाठी ६ पथके तैनात केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली. तसेच जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांचा जबाब अद्याप घेतला नसल्याचे पाटील म्हणाले. गोळीबार झाला त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर व पोलीस ठाणे प्रांगणात झालेल्या शिविगाळ, धक्काबुकीं व रिव्हॉल्वर काढणे आदी प्रकरणी तपास करून गुन्हे दाखल करण्याचे काम स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्याचे असल्याचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील म्हणाले. आमच्याकडे फक्त गोळीबार प्रकरणाचा तपास असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच फरार आरोपीला लवकरच अटक होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
गणपत गायकवाड कळवा पोलीस ठाण्यात?
गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे व संदीप सरवनकर यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हिललाईन ऐवजी कळवा पोलीस ठाण्यात ठेवले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे गोळीबाराचा तपास सुरू केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.