मितेश जगताप आत्महत्या प्रकरण : खटला मागे घेण्यासाठी कुटुंबीयांना पुन्हा धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 09:14 IST2018-04-27T09:01:14+5:302018-04-27T09:14:11+5:30
ऑटोमोबाइल इंजिनिअर मितेश जगतापच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पुन्हा एकदा मिळाले आहे.

मितेश जगताप आत्महत्या प्रकरण : खटला मागे घेण्यासाठी कुटुंबीयांना पुन्हा धमकी
कल्याण : ऑटोमोबाइल इंजिनिअर मितेश जगतापच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पुन्हा एकदा मिळाले आहे. यामुळे मितेशचे कुटुंबीय दहशतीच्या वातावरणात आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने जानेवारी 2017मध्ये आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून मितेशनं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर मितेशच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान हे प्रकरण मागे घेण्यासाठी जगपात कुटुंबीयांना निनावी धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्राद्वारे पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2018मध्येही त्यांना अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र मिळाले होते.
मितेशने टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. मितेशच्या आत्महत्येनंतरही कुटुंबीयांना पोलिसांचा जाच सुरूच राहिल्यानं कंटाळून टिटवाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवलीमध्ये स्थलांतर केले. न्याय मिळविण्यासाठी तसेच दोषींवर कारवाईसाठी न्यायालयात धाव घेतली. पण दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना वारंवार धमकी दिली जात आहे.
फेब्रुवारी 2018मध्येही मिळाले होते धमकीचे पत्र
फेब्रुवारी महिन्यात मितेशची आई पुष्पा जगताप या टिटवाळामधील जुन्या घरी गेलेल्या असताना त्यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले. या पत्रात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो लगेच मागे घ्या. पोलिस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घ्या, गप्प बसा. कमी असेल तर सांगा जास्त पैसे मिळतील. पोलिसात विरोधात कोर्टात जाऊन माघार घ्यायची आहे. त्यात तुमचे भले आहे. तक्रारदार राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काही दिवस तुमच्या हाती आहेत. काळजी घ्या अशा आशयाचे धमकीचे पत्र अज्ञाताकडून मिळाले होते.
या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अज्ञात व्यक्ती विरोधात मृत पुष्पा जगताप यांनी टिटवाळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रकरण कोर्टासमोर सादर होऊ नये म्हणून खटला मागे घेण्यासाठी निनावी पत्राद्वारे धमकाविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पुष्पा जगताप यांनी केला आहे. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात मिळालेले धमकीचे पत्र