'मीरा-भाईंदर एकेकाळी होता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला; सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय', मंत्री आदिती तटकरे यांचं विधान
By धीरज परब | Updated: October 31, 2025 14:59 IST2025-10-31T14:58:31+5:302025-10-31T14:59:07+5:30
Aditi Tatkare News: मीरा भाईंदर हा एकेकाळचा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्क मंत्री अदिती तटकरे यांनी मीरारोड येथे केले.

'मीरा-भाईंदर एकेकाळी होता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला; सर्वांना विश्वासात घेऊन युतीबाबत निर्णय', मंत्री आदिती तटकरे यांचं विधान
मीरारोड- मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार, महापौर, उपमहापौर व सर्वात जास्त नगरसेवक आणि बळकट संघटना होती. एकेकाळचा हा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क मंत्री अदिती तटकरे यांनी मीरारोड येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मीरा भाईंदर मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या.
मीरारोडच्या रसाज सिनेमा जवळ राष्ट्रीवादी काँग्रेसचे शहर मध्यवर्ती कार्यालयचे उदघाटन गुरुवारी रात्री मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार व प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस अनु पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष ममता मोराईस, युवा जिल्हाध्यक्ष जककी पटेल सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व जाती - धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे हि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे. महायुती सोबत जाताना अनेकांना या बाबत प्रश्न पडला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सर्व धर्म समभाव ह्या विचारधारेशी तडजोड केली नाही. गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे झालेल्या पहिल्या बैठकीत देखील अजितदादांनी आपली विचारधारा स्पष्ट करत त्याच्याशी तडजोड करणार नाही असे सांगितले होते.
मीरा भाईंदर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, महापौर, उपमहापौर आणि जास्त नगरसेवक होते पक्षाची संघटना पण मोठ्या प्रमाणात होती लोकसभेत व विधानसभेत महायुतीच्या उमेदवाराचे काम केले. काम करत असताना सर्वांची इच्छा होती कि एके काळी बालेकिल्ला असताना आपल्याला पण अधिका अधिक जागा लढवायला मिळाली पाहिजे.
पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय किती महत्वाचे असते याची जाण सर्वाना आहे. ह्या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी रोज बसले पाहिजेत. शहराच्या - नागरिकांच्या समस्या ह्या आमच्या पर्यंत व अजितदादांना पर्यंत पोहचवण्याची भूमिका घेतली पाहिजे. हे कार्यालय निवडणूक साठी आहेच पण येथील जनतेच्या सेवेसाठी आहे हा संदेश गेला लोकां मध्ये गेला पाहिजे. कामगार वर्ग, परप्रांतीय अनेक वर्षां पासून राहतात, महिला आदींच्या प्रश्नांना हात घातला पाहिजे.
आज अडीज कोटी पेक्षा जास्त महिलां पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहचवला आहे. विरोधक टीका करत होते कि योजना बंद करतील. कोणत्याही सरकारने आणली नव्हती ती योजना महिलांसाठी आणली. वित्त मंत्री अजित दादा आहेत आणि ४६ हजार कोटींची वार्षिक तरतूद आहे योजनेची. जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न महिला बाल विकास मंत्रालय करत आहे. आणखी पण अनेक योजना आहेत. राज्य बाहेरच्या महिलांना पण विविध योजनेतून लाभ देता येऊ शकतो. कामगार, महिला व आरोग्यातील योजना, बचत गट योजना आहेत त्याचा लाभ लोकांना मिळवून द्या असे मंत्री तटकरे म्हणाल्या.