मीरा-भाईंदर पालिका परिवहन आणि महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 18:21 IST2021-01-20T18:19:46+5:302021-01-20T18:21:24+5:30
mira-bhayandar : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालयात निवडणूक पार पडली.

मीरा-भाईंदर पालिका परिवहन आणि महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन समिती सभापती आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपाने सहज विजय मिळवला.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालयात निवडणूक पार पडली. परिवहन समिती सभापती पदासाठी भाजपाचे दिलीप जैन यांना ९ तर शिवसेनेच्या राजेश म्हात्रे यांना केवळ २ मते मिळाली. जैन यांनी म्हात्रेंचा प्रभाव केला. सेनेचे शिवशंकर तिवारी व काँग्रेसचे राजकुमार मिश्रा गैरहजर होते .
महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजपाच्या सभापती पदाच्या उमेदवार वंदना पाटील यांना १० तर शिवसेनेच्या तारा घरत यांना ५ मते मिळाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता भोईर यांना १० तर काँग्रेसच्या मर्लिन डिसा यांना ५ मते पडली. वंदना व सुनीता यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी तारा व मर्लिन यांचा सहज पराभव केला .
पती पाठोपाठ पत्नीला देखील सभापती पद
वर्षभरा पूर्वी भाजपाने परिवहन समिती सभापती पद मंगेश पाटील यांना दिले होते . मंगेश यांची सभापती पदाची मुदत संपली असताना आता त्यांच्या पत्नी नगरसेविका वंदना पाटील यांना महिला बालकल्याण समिती सभापती पद दिले आहे . वंदना यांना दोन वर्ष स्थायी समिती सदस्य पद सुद्धा देण्यात आले आहे . त्यातच पतीला परिवहन सभापती पद आणि पाठोपाठ पत्नी वंदना यांना महिला बालकल्याण सभापती पद देण्यात आल्याने एकाच घरात पदांची किती खैरात देणार असा सवाल भाजपातूनच विचारला जात आहे .