मीरा-भाईंदर पालिका निवडणूक; भाजप-शिंदेसेनेमध्ये रंगणार खरी चुरस
By धीरज परब | Updated: December 16, 2025 11:52 IST2025-12-16T11:52:01+5:302025-12-16T11:52:43+5:30
मराठी टक्का कमी, तर भाजपचा मीरा-भाईंदरमध्ये हक्काचा मानला जाणारा उत्तर भारतीय, राजस्थानी-गुजराती व जैन मतदारांचे मोठे प्राबल्य आहे.

मीरा-भाईंदर पालिका निवडणूक; भाजप-शिंदेसेनेमध्ये रंगणार खरी चुरस
धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मराठी टक्का कमी, तर भाजपचा मीरा-भाईंदरमध्ये हक्काचा मानला जाणारा उत्तर भारतीय, राजस्थानी-गुजराती व जैन मतदारांचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे भाजपला २०१७ प्रमाणेच यंदाही मीरा-भाईंदर पालिकेवर एकहाती सत्ता आणायची आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे मीरा-भाईदरमध्ये भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करणार, असा दावा शिंदेसेना करत आहे. यंदा भाजप आणि शिंदेसेनेत प्रामुख्याने चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.
आ. नरेंद्र मेहतांनी शिंदेसेनेशी युती करायची, तर भाजपाला ६५, सेनेला १७ व उरलेल्या १३ जागा वाटून घेऊ, असा जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला होता. मंत्री सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष स्तरावर बोलणार असे प्रत्युत्तर दिले होते. मीरा-भाईंदरमधील भाजप व शिंदेसेनेच्या रस्सीखेचमध्ये महायुतीतील अजित पवार गट व आरपीआय यांची डाळ भाजप-शिंदेसेना शिजू देतील, ही शक्यता कमीच आहे. काँग्रेसचा मीरारोडमधील ठरावीक पट्टा, तर उद्धवसेना आणि मनसे, शरद पवार गटाचे अल्पबळ पाहता मीरा-भाईंदर पालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे.
२०१७ चे पक्षीय बलावल - २५ नगरसेवक
भाजप - ६१
शिवसेना - २२
काँग्रेस - १२
सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप - ६५
शिंदेसेना - १७
काँग्रेस - १०
उद्धवसेना - १
शिवसेनेच्या १ माजी नगरसेविका तटस्थ
शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे कोरोना काळात निधन झाले.
दावे-प्रतिदावे...
एकेकाळी मीरा भाईंदर हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण २०१४ साली मोदी पर्वाने येथील मतदारांचा कल भाजपाकडे वाढला.
महापालिकेत २०१७साली चार सदस्य पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा फायदा भाजपाला झाला आणि भाजपाचे तब्बल ६१ नगरसेवक निवडून आले. याच पालिकेत यंदा ७० पार असा प्रचार भाजपकडून आ. नरेंद्र मेहता करत आहेत.
पालिकेत शिवसेनेची सत्ता आणणार असे शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक सांगताहेत.