कचरामुक्त शहरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता...
By धीरज परब | Updated: July 28, 2025 11:27 IST2025-07-28T11:27:33+5:302025-07-28T11:27:33+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले.

कचरामुक्त शहरपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता...
राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका. (शब्दांकन : धीरज परब)
मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाय, या शहराला कचरामुक्त शहर ५ तारांकित मानांकनही मिळाले. हा प्रवास सोपा नव्हता, पण नागरिकांचा सहभाग, अधिकारी - कर्मचारी- सफाई कामगारांची मेहनत आणि नियोजनबद्ध कामांमुळे हा पुरस्कार मिळाला, अशी भावना आयुक्त राधाबिनोद शर्मा व्यक्त केली.
हा प्रवास कसा होता?
उत्तर : हा एक न थांबणारा प्रवास आहे. २०१७ मध्ये देशात १३० व्या क्रमांकावरून २०२५ मध्ये या महापालिकेने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. हा प्रवास सोपा नव्हता. सर्वांचा सहभाग, सातत्य, सचोटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळाले आहे.
कचरा व्यवस्थापन कसे केले जाते?
उत्तर : दररोज ५५० मेट्रिक टनपर्यंत कचरा निर्माण होतो. २ हजार २५० सोसायट्या, झोपडपट्टी, गावे, हॉटेल्स, आस्थापनांमधील कचरा वर्गीकृत आणि संकलित केला जातो. नारळाच्या कचऱ्याचा वेगळा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. डिजिटल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आहे. कचरा वाहनांना जीआयएस मॅपिंग आणि क्यूआर कोड देऊन डॅशबोर्डवर एकत्रित व्यवस्थापन केले जाते. स्वच्छ भारत वॉर रूम केली आहे. कचरामुक्त शहरासाठी संध्याकाळची आणि रात्रीची साफसफाई सुरू करण्यात आली.
कचऱ्यावर प्रक्रिया कशी केली जाते?
उत्तर : देशातील पहिला स्वदेशी नियंत्रित सोलर तंत्रज्ञानचा ‘विन्ड्रो कंपोस्टिंग’ हा प्रकल्प सुरू आहे. उत्तन येथे २८० टन ओल्या आणि १५० टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ओल्या - सुक्या एकत्रित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुरू केला. नवघर, भाईंदर पश्चिम व कनकिया येथे मिळून ५० टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस - वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.
नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळवला?
उत्तर : स्वच्छ भारत मिशनमध्ये जनजागृतीला महत्त्व आहे. घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा, ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रबोधन कार्यशाळा आयोजित केल्या. शहर स्तरीय स्पर्धांचे आयोजन नावीन्यता कक्षामार्फत केले. गृहसंकुले, हॉटेल्स, सरकारी कार्यालये, मार्केट, रुग्णालये, शाळा इत्यादींचे गट करून त्यांना मानांकन दिले. त्यातून व्यापक स्तरावर जनजागृती झाली. प्रत्येक शाळेत ‘स्वच्छतेची पाठशाळा’ उपक्रम राबवला. व्हॉट्स ॲप, चॅटबोट्स, मदत कक्ष, हेल्पलाइनद्वारे जनजागृती करण्यात आली.
उत्तन डम्पिंगची समस्या कशी सोडवणार ?
उत्तर : पूर्वीपासून साचलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या परिसरात कचरा निर्मिती त्याच परिसरात त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे धोरण आहे. एमआयसीएल आणि जेके गृहसंकुल, जीसीसी हॉटेल्स येथे कचरा प्रक्रियेचे उत्तम मॉडेल तयार झाले आहे. ओल्या कचऱ्यापासून आणखी ८० टनाचा विन्ड्रो कंपोस्टिंग प्रकल्प आणि ५० टनाचा बायोगॅस - वीज प्रकल्प सुरू करणार आहोत. २२ टोगो व्हॅन लवकरच येणार असून एका व्हॅनची २ टन ओल्या कचऱ्यावर वाहनात प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. जेणे करून उत्तन प्रकल्पावरील कचऱ्याचा भार कमी होईल.
भविष्यातील योजना काय?
उत्तर : ‘कॉल ऑन’ कचरा कलेक्शन योजना विचाराधीन आहे. गृहसंकुल, मॉल, लग्न आदी समारंभाची ठिकाणे येथील तुमचा कचरा घेण्यासाठी पथक वाहनासह दारी येईल, मात्र ते सशुल्क असेल. फेरीवाल्यांना त्यांचा कचरा संकलनासाठी पद्धत निश्चित करून स्वच्छतेचा आग्रह धरला जाईल.