अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:20 IST2025-10-29T07:20:56+5:302025-10-29T07:20:56+5:30
कापूरबावडी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे

अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
ठाणे : ठाण्यातील कापूरबावडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली. यामध्ये पीडित मुलगी ८० टक्के होरपळली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. कापूरबावडी पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी ती ठाण्यातील घरात एकटी असताना अचानक घरातून धूर येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला माहिती दिल्यानंतर कुटुंबीय घरात पोहोचले असता, आरोपी मुलगा तेथे उपस्थित होता आणि मुलगी हाेरपळलेल्या अवस्थेत ओरडत होती. तिला तत्काळ ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता तिला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अखेर पीडितेच्या आईने कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
दोघांमधील प्रेमसंबंधाचा प्राथमिक तपासात अंदाज
दोघांमध्ये पूर्वीपासून ओळख असून, वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असावेत, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली असल्याचे कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांनी सांगितले.