दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 22:10 IST2025-09-29T22:10:14+5:302025-09-29T22:10:38+5:30
तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दहिसर टोलनाका हटवून लांब महामार्गावर नेण्यास भाजपाने विरोध चालवला असताना सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथे पाहणी करत विविध उपाययोजना सुचवत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. मुंबईकडे जाताना आणखी एक नवीन मार्गिका खुली करण्यासह टोलनाका मधील लोखंडी फ्रेम, बूथ, डिव्हायडर, खांब आदी तात्काळ काढून टाकण्यास तसेच टोल बूथ मागे पुढे करण्यास सांगितले असून त्यामुळे वाहतूक कोंडीतुन दिलासा मिळेल, असे सरनाईक म्हणाले.
दहिसर टोलनाका वरील वाहतूक कोंडी हि गंभीर समस्या बनली असून हि समस्या सोडवण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी टोलनाकाच हटवून स्थलांतरित करण्याची मागणी केल्यावर तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने वरसावे किंवा खाडी पुलाच्या पलीकडे महामार्गावर टोलनाका नेण्याचे पर्याय आले. परंतु मीरा भाईंदर भाजपा सह वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील त्यास जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे टोलनाका हटवण्याचा शिवसेना शिंदे गट आग्रह धरत असताना भाजपा कडून मात्र पर्यायी जागांवर टोलनाक्यास विरोध होत आहे. दहिसर टोलनाका मुदत २०२९ पर्यंत आहे त्यामुळे टोलनाकाच लवकर बंद करण्याची मागणी देखील होत आहे.
दरम्यान, सोमवारी मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथील पाहणी केली. यावेळी मुंबई पोलीस व महापालिका, राज्य रस्ते विकास मंडळ, मीरा भाईंदर महापालिका व पोलीस, टोल ठेकेदार कंपनी आदींचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुंबई कडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाका लगत असलेला रस्ता डिव्हायडर काढून तो रस्ता वाहनांना खुला करा. तेथील रस्त्यात ठेवलेल्या क्रेन, बाकडे हटवून मोकळा करा असे आदेश सरनाईक यांनी दिले. या शिवाय वाणिज्य वाहनां साठी मोजके टोलबूथ ठेऊन बाकी सर्व बूथ काढणे, टोलनाकाचे जाहिरात फलक व फ्रेम, डिव्हायडर, लोखंडी खांब आदी सर्व काढून रस्ता मोकळा करा.
मुंबईतून मीरा भाईंदर कडे येणाऱ्या मार्गावरील टोलनाका हा पुढे न्यावा असे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी काही अधिकारी यांनी डिव्हायडर, होर्डिंग आदी काढतो, दोन आठवड्याची मुदत द्या सांगितले असता मंत्री सरनाईक संतप्त झाले. काढा हो, किती वर्ष अजून वाट बघणार असे खडसावले. मंत्री सरनाईक यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी व्हिडीओ कॉल वर चर्चा केली. याशिवाय पेणकरपाडा सिग्नल, पांडुरंगवाडी, मिरागाव भागातील महामार्गवर होणाऱ्या कोंडी बाबत अनेक सूचना देत कार्यवाही करण्यास मीरा भाईंदर महापालिका, वाहतूक पोलीस आदींना सांगितले आहे. टोलनाका हटवणार असे पुन्हा सांगतानाच तात्काळ नागरिकांना दिलासा देता यावा म्हणून ह्या उपाययोजना करत आहोत असे ते म्हणाले.