महाविकास आघाडीमुळे मेट्रो ४ च्या कामाला ब्रेक, देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:24 IST2025-09-22T13:16:21+5:302025-09-22T13:24:49+5:30
Devendra Fadnavis Criticizes MVA: ०१९ नंतर आलेल्या सरकारने काम जवळपास थांबवल्याने प्रकल्पाला अडीच वर्षांचा विलंब झाला. “हा विलंब झाला नसता तर आज आपण संपूर्ण ५८ किमी मार्गिकेचे उद्घाटन करत असतो. मात्र आता पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील,” असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीमुळे मेट्रो ४ च्या कामाला ब्रेक, देवेंद्र फडणवीस यांची टीका
ठाणे - मेट्रो ४अ च्या पहिल्या टप्प्याच्या टेस्टिंगला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. या वेळी बोलताना त्यांनी २०१९ पर्यंत प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगितले. मात्र २०१९ नंतर आलेल्या सरकारने काम जवळपास थांबवल्याने प्रकल्पाला अडीच वर्षांचा विलंब झाला. “हा विलंब झाला नसता तर आज आपण संपूर्ण ५८ किमी मार्गिकेचे उद्घाटन करत असतो. मात्र आता पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षे लागतील,” असे फडणवीस म्हणाले.
मेट्रो ४ आणि ४अ मिळून ३५ किमी लांबीचा हा मार्ग असून ३२ स्थानकांचा यात समावेश आहे. प्रकल्पावर जवळपास १६ हजार कोटी रुपये खर्च होणार असून पूर्ण मार्गिका सुरू झाल्यावर दररोज १३ लाख ४७ हजार प्रवासी या मार्गाचा लाभ घेतील. मोघरपाडा येथे ४५ हेक्टर जागेवर डेपो उभारण्यात येत आहे. या डेपोमध्ये मेट्रो ४, ४अ, १० आणि ११ ची सोय होणार आहे.
फडणवीस म्हणाले, “हा मार्ग पूर्व-पश्चिम उपनगरे, मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा ठरेल. वडाळा-सीएसएमटी मेट्रो ११ ला जोडल्यावर हा मुंबईतील सर्वात लांब ५५ किमीचा मार्ग बनेल आणि रोज तब्बल २१ लाख प्रवासी प्रवास करतील. यामुळे प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.”
या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. “आमचा प्रयत्न पुढील वर्षभरात जास्तीत जास्त टप्पे पूर्ण करण्याचा आहे, तर काही कामे २०२७ पर्यंत पूर्ण होतील,” असे आश्वासन त्यांनी दिले.